गुहागर – गुहागर – विजापूर महामार्गाचे रुंदीकरण आणि मजबुतीकरण करण्याचे काम सध्या वेगात सुरू आहे. तालुक्यातील शृंगारतळी बाजारपेठेमध्ये सुधा हे काम युध्दपातळीवर सुरू असतानाच रस्त्याच्या कडेला असलेले विद्युत पोल, विद्युत ट्रान्सफॉर्मर, अनधिकृत बांधकाम हे मोठ्या प्रमाणावर काढण्याचे काम सुरू आहे. अशातच शृंगारतळीतील बँक ऑफ इंडीयाच्या समोरील तो बेकायदेशीर रित्या टाकलेला ट्रान्सफॉर्मर काढण्याची मागणी आता जोर धरत आहे.
तालुक्यातील शृंगारतळी ही महत्वाची बाजारपेठ. या बाजारपेठेत रस्ता रुंदीकरणाचे पूर्वनियोजीत काम माहिती असतानासुध्दा बँक ऑफ इंडियाच्या समोर एका ठेकेदाराने आपला मनमानी कारभार करत महावितरणच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरत लोकांच्या जिवीताला हानी होईल अशा प्रकारे रस्त्याच्या अगदी कडेला उभा केला त्यावेळेला हे काम शृंगारतळी बाजारपेठ बंद असताना आणि रात्रीचे करण्यात आले. या कामाबाबत तेथीलच स्थानिक रहिवाशी अकबर कारभारी यांनी तक्रारही केली आहे. मात्र या तक्रारीला केराची टोपली दाखवत त्या ठेकेदाराने आपल्या आर्थिक व्यवहाराच्या जोरावर हा ट्रान्सफॉर्मर बेकायेदशीर रित्या उभा केल्याची चर्चा शृंगारतळीत सुरू आहे.
सध्या शृंगारतळीतील रस्ता रुंदीकरणाच्या या कामात ही डी. पी. अडथळा ठरत आहे. त्यामुळे ही डी.पी. काढण्याचा खर्च आता कोण करणार? याबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे महावितरणचे अधिकारी, सार्वजिनक बांधकाम विभागाचे अधिकारी यांना हाताशी धरून रस्त्याच्या कडेला उभा केलेला हा अनधिकृत विद्युत ट्रान्सफॉर्मर कोणत्याही परीस्थीती हटवावाच, जर हा विद्युत ट्रान्सफॉर्मर हटवणार नसाल तर आम्हीसुध्दा आमच्या दुकानासमोरील कोणतेही बांधकाम तोडून देणार नाही असा इशारा शृंगारतळीतील व्यापारी वर्गाने दिला आहे.