चिपळूण – चिपळूण शहरातील काविळतळी येथे दारूच्या नशेत पुतण्याने काकाच्या डोक्यात लाकडी दंडुका मारून खून केल्याची घटना काल रविवारी सायंकाळी घडली.
ऐन दिवाळीत ही घटना घडल्याने चिपळूण शहर व परिसरात खळबळ उडाली आहे. मयताचे मोठे बंधू सुरेश रामा चिपळूणकर यांनी पोलीस स्थानकात याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार वसंत रामा चिपळूणकर हे काविळतळी रोहिदासवाडी येथे एकटेच राहत होते. पेंटिंगचा व्यवसाय करणाऱ्या वसंत चिपळूणकर यांच्या घराशेजारी राहणाऱ्या त्यांचा पुतण्या गणेश बाळकृष्ण चिपळूणकर याने दारूच्या नशेत आपले चुलते वसंत चिपळूणकर यांच्या डोक्यात लाकडी दंडुक्याने प्रहार करून खून केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना प्राप्त झाली. पोलिसांनी वसंत चिपळूणकर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कामथे उपजिल्हा रुग्णालयात पाठवला व गणेश चिपळूणकर याला ताब्यात घेतले आहे. वसंत चिपळूणकर यांच्या पश्चात पत्नी, इंजिनिअर असणारा मुलगा, मुलगी असा परिवार आहे.