गुहागर -कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढल्यानंतर कोरोनाबाधित रूग्णांवर तातडीने उपचार व्हावेत यासाठी गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर मधील अभियांत्रिकी महाविद्यालयात सुरू करण्यात आलेले कोविड केअर सेंटरमध्ये कोरोना रुग्णाची संख्या घटली असल्याने प्रशासनाकडून ते सेंटर बंद केले आहे.
वेळणेश्वर महाविद्यालयातील मुलांच्या वसतिगृहात शासकीय कोविड सेंटरची निर्मिती करण्यात आली होती. या कोविड सेंटरमध्ये आतापर्यंत 500 हून अधिक रूग्णांवर उपचार करण्यात आले. गुहागर तालुक्यातील कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत कमालीची घट झाल्याने हे कोविड सेंटर काही कालावधीसाठी बंद करण्यात आले आहे. कोरोनाबाधित रूग्णांवर सुरुवातीला रत्नागिरी येथील जिल्हा रूग्णालयात उपचार केले जात होते. . मात्र दिवसागणिक वाढलेल्या कोरोना बाधितांच्या संख्येने प्रशासकीय यंत्रणेवर अतिरिक्त ताण आला होता. रत्नागिरी जिल्हा रूग्णालयातील यंत्रणेवरील ताण वाढून जागेचीही कमतरता भासत होती. यामुळे अनेक रूग्णांना खासगी कोविड सेंटरचा आधार घ्यावा लागत होता. अशा वेळी तालुक्यातील नागरिकांना वेळणेश्वर येथे हे कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले होते. मात्र गेल्या पंधरा दिवसापासून तालुक्यातील कोव्हिडं पॉझिटिव रुग्णांची संख्या कमी झाल्याने अखेर कोव्हिडं सेंटर प्रशासनाच्या आदेशाने आजपासून बंद करण्यात आले आहे. यापुढे गुहागर तालुक्यात पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यास त्याला अधिक उपचारासाठी दापोली येथील कृषी महाविद्यालयातील सेंटरमध्ये दाखल करण्यात येईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.