गुहागर – ओबीसींच्या मागण्यांसाठी संघर्ष समितीच्यावतीने ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता ओबीसी आरक्षणासंदर्भात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील सर्व तहसिलदारांना निवेदन देण्यात येणार आहे.
गुहागर तहसील कार्यालयासमोरही तालुक्यातील संघर्ष समितीच्यावतीने निदर्शने केली जाणार आहेत. ३ नोव्हेंबरच्या या आंदोलनाची पूर्वतयारी आणि रुपरेषा ठरवण्यासाठी गुहागर तालुका कुणबी सहकारी पतसंस्थेच्या आबलोली येथील सभागृहात २२ ऑक्टोबरला दुपारी २ वाजता सभा बोलावण्यात आली होती. या सभेला समाजाच्या संघटनेचे प्रतिनिधीं आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याच सभेमध्ये ३ नोव्हेंबरला तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आला. ३ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वा. गुहागर बस स्थानक येथे तालुक्यातील सर्व ओबीसी बांधव जमा होणार आहेत. त्यानंतर तेथून गुहागर तहसील कार्यालयावर ११ वा. निदर्शने करण्यात येणार आहे. यावेळी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ओबीसी कल्याण मंत्री यांना देण्यासाठी तहसिलदार यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत. तरी तालुक्यातील सर्व ओबीसी बांधवांनी यावेळी उपस्थित राहून ओबीसी आंदोलनाला यशस्वी करावे, असे आवाहन गुहागर ओबीसी संघर्ष समन्वय समिती निमंत्रक पांडुरंग पाते यांनी केले आहे.