गुहागर – (विशेष प्रतिनिधी )- गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील प्रसिद्ध मीना बाजार येथे एका दुकानावर ग्रीननेट बांधण्यासाठी चढलेल्या १७ वर्षीय युवकाचा ११ केव्हीच्या वीज वहिनीचा धक्का लागून त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. या प्रकाराने शृंगारतळी बाजारपेठेत एकच खळबळ उडाली आहे.
शृंगारतळी येथील शृंगारी येथील इब्राहिम तांडेल वय १७ हा या बाजारपेठेतील मीना बाजार याठिकाणी एका दुकानदाराचे ग्रीननेट बांधण्यासाठी गेला होता. सकाळच्या सुमारास दुकानाच्या वरील बाजूस ग्रीननेट बांधत असताना वरून गेल्या विजेच्या ११ केव्हीच्या वीज वाहिन्यांना इब्राहिमचा स्पर्श झाल्याने तो जागीच मृत्यू पावला.
इब्राहिमचे दहावीपर्यंत शिक्षण पाटपन्हाळे इंग्रजी माध्यम हायस्कूल मध्ये झाले. गेल्याच वर्षी त्याने दहावी पूर्ण केली होती. इब्राहिमला दोन भाऊ आहेत. त्याच्या अचानक जाण्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. त्यांचे वडिल कामानिमित्त बाहेरगावी असतात. मात्र एवढा मोठा प्रकार घडूनही पाटपन्हाळे पोलीस पाटील यांनी गुहागर पोलिसात याबाबत काहीच माहिती न दिल्याने गुहागर पोलिसान मधुन संताप व्यक्त करण्यात येत आहे. घडलेला प्रकार हा दुर्देवी आहे या ठिकाणी असा प्रकार या आधीही घडल्याची चर्चा शुंगारतळी मध्ये सुरू आहे.