चिपळूण – चिपळूण तालुक्यातील कामथे कोविड रुग्णालयात आज ड्युरा ऑक्सिजन सेंटर प्रणालीच्या लोकार्पण प्रसंगी खासदार सुनील तटकरे आणि आमदार भास्कर जाधव यांच्यात शाब्दिक टोलेबाजी पहायला मिळाली.
या कार्यक्रमात खासदार सुनील तटकरे यांच्या आधी आमदार भास्कर जाधव यांचे भाषण झाले. तेव्हा भास्कर जाधव यांनी आता माझ्यानंतर तटकरे साहेब भाषण करतील आणि ते टोलेबाजी करतील, असे सांगितले. मग खासदार सुनील तटकरे भाषणाला उभे राहिले आणि मी तुमच्यावर टोलेबाजी करणार नाही, असे म्हणाले, तेव्हा भास्करराव जाधव यांनीही मीही तुमच्यावर यापुढे टोलेबाजी करणार नाही, असे उत्तर दिले. त्यावर हजरजबाबीपणाने सुनील तटकरे म्हणाले, ‘मी तुमच्यावर टोलेबाजी करणार नाही, पण तुम्ही हा शब्द पाळाल की नाही, हे सांगता येत नाही. मी तुमची २५ वर्षांची कारकीर्द जवळून पाहिली आहे.’ असे तटकरे म्हणाले तेव्हा उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. दोघांच्या शेजारी बसलेलं रमेशभाई कदम आणि आमदार शेखर निकामही ‘मास्क’मधून खदखदून हसत होते. एकंदरीत ड्युरा ऑक्सीजन सेंटर प्रणालीच्या लोकार्पण प्रसंगी घडलेला हा किस्सा सध्या जोरदार चर्चेत आहे.