चिपळूणचे डेशिंग उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे……

0
681
बातम्या शेअर करा

अल्पावधीत विविध प्रकारच्या गुन्ह्यांचा छडा लावणारे कर्तव्यदक्ष तरुण तडफदार चिपळूणचे उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांची नुकतीच ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे बदली झाली. चिपळूण पोलीस दलातील केवळ एक वर्षाच्या उत्कृष्ट सेवेतील नवनाथ पुराणाची आता खऱ्या अर्थाने समाप्ती झाली आहे. चोऱ्या, अवैध धंदे यांवरील कारवाईबरोबरच खून प्रकरणांचा छडा लावून एक वर्षाच्या अल्पावधीत आपल्या उत्कृष्ट कारकिर्दीचा सेवेतील नवनाथ पुराणाचा एक अध्याय त्यांनी पूर्ण केला आहे.

सप्टेंबर 2019 मध्ये चिपळूणातील पोलीस सेवेत दाखल झालेल्या नवनाथ ढवळे यांनी सुरुवातीपासूनच चिपळूण-गुहागर तालुक्यात धडाकेबाज कामगिरी केली होती. तत्पूर्वी कराड, गडचिरोली, नागपूर ग्रामीण ठिकाणी त्यांनी काम केले होते. गडचिरोलीसारख्या दुर्गम, खडतर विभागात 2015-17 अशी दोन वर्षे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून काम केले होते. जिल्ह्यातील नक्षलवादी कारवायांना आळा घालण्यासाठी आणि नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते. अनेकदा जीव धोक्यात घालून नक्षलवाद्यांना ते सामोरेही गेले होते. या केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना पोलीस महासंचालक पदक, आंतरिक सुरक्षा पदक, विशेष सेवा पदक पुरस्काराने सन्मानीत केले होते.

आपल्या चिपळूण येथील सेवेत ढवळे यांनी चिपळूण शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बहादूरशेख नाका परिसरात बेकायदेशीर सुरु असणाऱ्या जुगार अड्ड्यावर छापा मारुन तो उध्दवस्त केला होता. या धडक कारवाईमुळे त्यांचे चिपळूण शहरासह परिसरात कौतुकही झाले होते. चिपळूण व गुहागर विधानसभा निवडणुका शांततेत पार पाडण्यात त्यांनी यशस्वी कामगिरी बजावली होती.

गोवंश हत्याप्रकरणात त्यांनी आंतरराज्यीय टोळी जेरबंद केली होती. एका जबरी चोरी गुन्ह्यातील आरोपींना त्यांनी शिताफीने अटक केली होती. अवैध धंदे, जुगारअड्डे, दारु यावर धडाकेबाज कारवाई करुन आपला दबदबा निर्माण केला होता. कोरोना काळातील त्यांची कामगिरी कौतुकास्पद ठरली होती. त्यांच्या यामधील कामगिरीवर आमच्या दै.तरुण भारतने कोवीड योध्दा म्हणून विशेष पुरवणीतून लेखाजोगा मांडला होता. गुहागर दौऱ्यात त्यांच्या अनेकांबरोबर गाठीभेट होत असत व गुन्ह्यांबाबत चर्चा करुन माहिती मिळवत असतं. त्यामुळे नवनाथ ढवळे सर्वसामान्यांच्या कौतुकास पात्र ठरले होते.

एक वर्षाच्या अल्प कालावधीत ढवळे यांची जी उत्कृष्ट सेवा बजावली त्यामध्ये गुहागर तालुक्यातील दोन खूनांच्या यशस्वी तपासाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. या यशस्वी तपासाने त्यांची संपूर्ण कारकीर्दच उजळून निघाली. गेल्यावर्षी झालेले पिंपर येथील खून प्रकरण. या तपासात अवघ्या दोन महिन्यातच धागेदोरे हाती लावून ढवळे यांनी या खून प्रकरणातील आरोपींना गजाआड केले होते.

महिन्याभरापूर्वी पैशाच्या हव्यासापोटी वेलदूर येथील महिला बँक मँनेजरच्या खूनाचा तपास म्हणजे पोलिसांना एकप्रकारे आव्हानच होते. मात्र, ढवळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह केवळ दोन तासातच या प्रकरणाचा छडा लावून आरोपींना गजाआड केले होते. या प्रकरणाने त्यांची कामगिरी यशस्वी ठरलीच शिवाय चिपळूण पोलीस सेवेतील ही अखेरची कारकीर्द उजळूनच गेली.

ढवळे साहेब यांच्या बदलीने एका कर्तव्यदक्ष, धडाकेबाज अधिकाऱ्याला चिपळूण व गुहागर तालुक्यातील जनता मुकली आहे. त्यांच्या या एक वर्षातील अलौकीक कामगिरीने नवनाथ पुराणाचा एक यशस्वी अध्याय येथे समाप्त झाला आहे. ढवळे साहेबांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here