गुहागर – गेले दोन दिवस शुंगारतळी बाजारपेठेतील व्यापारी आणि त्याच्या दुकानातील कर्मचारी अशा 15 जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे मात्र याचवेळी ग्रामपंचायत, ग्रामस्थ आणि व्यापारी संघटनेने बाजारपेठ बंदचा घेतलेला निर्णय योग्य होता. यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
गुहागर तालुक्यासह शृंगारतळीमध्ये दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यातच शासनाने लॉकडाऊनमधील बंधने शिथील करायला सुरुवात केल्याने शृंगारतळी बाजारपेठेतील वर्दळही वाढली आहे. याचाच परिणाम म्हणून गणेशोत्सवानंतर गुहागरमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढु लागली. कोरानाचा वाढता प्रादुर्भाव व शुंगारतळीतील गर्दी पाहून शृंगारतळी बाजारपेठ बंद करावी अशी मागणी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे केली. मात्र या मागणीला काही व्यापाऱ्यांनी विरोधही केला. अखेर ग्रामपंचायतीच्या पुढाकाराखाली ग्रामस्थ व व्यापाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीला तहसीलदार सौ. लता धोत्रे उपस्थित होत्या. या बैठकीत सरपंच संजय पवार यांनी बाजारपेठ बंद मागची भूमिका सांगितली. अखेर विचार विनिमय करुन व्यापारी संघटनेने ११ सप्टेंबर पासून 14 सप्टेंबर पर्यंत बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. याच बैठकीत पवार यांनी व्यापाऱ्यांना आवाहन केले होते की, अँटीजेन टेस्टची सुविधा शृंगारतळीमध्ये सुरु झाली आहे. या संधीचा फायदा घेवून व्यापाऱ्यांनी स्वत:ची व त्यांच्या दुकानातील कर्मचाऱ्यांनी अँटीजेन टेस्ट करुन घ्यावी. पवार यांच्या विनंतीला मान देत व्यापाऱ्यांनी ॲटीजेन टेस्टला होकार दिला. त्याप्रमाणे गेल्या दोन दिवसात शृंगारतळीमधी व्यापाऱ्यांनी तपासणीला सहकार्य केले. या तपासणीत 15 जण कोरोनाग्रस्त असल्याचे समोर आले आहे.