चिपळूण – वाशिष्ठी डेअरी प्रकल्प आयोजित ‘वाशिष्ठी डेअरी कृषी व पशुधन प्रदर्शनाला’ सलग दोन वर्षात मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर आता तिसऱ्या वर्षी नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात दि. ५ ते ९ जानेवारी २०२६ दरम्यान चिपळूणमध्ये वाशिष्ठी डेअरी कृषी व पशुधन प्रदर्शन २०२६ कृषी महोत्सव बहाद्दरशेखनाका येथील चिपळूण नगर परिषदेचे स्वा. वि. दा. सावरकर मैदानात आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव व मुख्य प्रवर्तक स्वप्ना यादव यांनी दिली. सलग तिसऱ्या वर्षी होत असलेल्या कृषी महोत्सवामुळे ‘कोकण कृषीची पंढरी’ होण्यास वेळ लागणार नाही, असा विश्वास यानिमित्ताने प्रशांत यादव व स्वप्ना यादव यांनी व्यक्त केला आहे.
कोकणात दुग्ध व्यवसाय यशस्वी होत नाही, अशी नकारात्मक भावना गेल्या अनेक वर्षांपासून रुजलेली आहे. मात्र, याला छेद देत परिपूर्ण आणि अत्याधुनिक दुग्ध प्रकल्पाची उभारणी करून सातत्यपूर्ण सर्वोत्कृष्ट दर्जेदार उत्पादनांमुळे अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीस उतरलेला मे. वाशिष्ठी मिल्क अॅण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा.लि. हा प्रकल्प यशस्वीपणे दिमाखदार वाटचाल करीत आहे.कोकणातील शेतकऱ्यांसाठी पूरक व्यवसायाचा पर्याय उभा करून त्यांना आर्थिक समृद्धी मिळवून द्यावी, इथल्या तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, हे स्वप्न उराशी बाळगून स्टेट बँक ऑफ इंडिया, बहाद्दरशेख नाका येथील बँकेच्या अर्थ साहाय्याने वाशिष्ठी मिल्क अॅण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि. या दुग्ध प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. ७ सप्टेंबर २०२१ रोजी चिपळूण तालुक्यातील पिंपळी खुर्द येथे चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था लि. चिपळूणचे संस्थापक अध्यक्ष सुभाष चव्हाण यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. नियोजनबद्ध कामामुळे अतिशय कमी कालावधीत अत्याधुनिक वाशिष्ठी दुग्धप्रकल्प उभा राहिला. ५ फेब्रुवारी २०२३ रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने तर राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते प्रत्यक्षपणे या प्रकल्पाचे शानदार उद्घाटन झाले. लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या साक्षीने हा सोहळा संपन्न झाला.कोकणात या अगोदर काही लोकांनी दुग्ध प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न केला. परंतु, विविध कारणांमुळे हे प्रकल्प अल्पावधीतच बंद पडले. कोकणात दुग्ध प्रकल्प यशस्वी होत नाही, अशी मानसिकता झाली. त्यामुळे कोकणातील शेतकऱ्यांची मानसिकता बदलून पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांशी स्पर्धा करणारे शेतकरी आपल्या कोकणात तयार व्हावेत, असे स्वप्न सुभाषराव चव्हाण यांनी पाहिले आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली वाशिष्ठी डेअरीचा प्रकल्प पूर्णत्वास गेला. या प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक शेतकऱ्यांसह अनेक लोकांना रोजगाराच्या वाटा निर्माण झाल्या आहेत.
सलग दोन वर्ष वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले जात आहे. पहिल्याच वर्षी तीन दिवस हे प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनाला मिळालेला प्रतिसाद आणि कृषीप्रेमींच्या मागणीनुसार गतवर्षी तब्बल ५ दिवस हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. कृषी प्रदर्शनाचा कोकणातील हा पहिलाच प्रयोग सर्वांच्या उदंड प्रतिसादामुळे सलग दोन वर्षे यशस्वी होत आहे. लाखो कृषी प्रेमी आणि नागरिक या प्रदर्शनाला भेट देतात. यंदाही हे प्रदर्शन पाच दिवस सुरू राहणार आहे. सलग तिसऱ्या वर्षीही या प्रदर्शनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळेल, असा विश्वास वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव व मुख्य प्रवर्तक स्वप्ना यादव यांनी व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांनी या कृषी महोत्सवात सहभागी व्हावे. तसेच स्टॉल नोंदणीसाठी ९४२२६६११९७, ९६३७६०५७५७, ७५८८३३००११, ९८९०३९३८२३, ७७२२०४५०४८ या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव व मुख्य प्रवर्तक स्वप्ना यादव यांनी केले आहे.
प्रदर्शनाची वैशिष्ट्ये
वाशिष्ठी डेअरी प्रकल्प आयोजित वाशिष्ठी कृषी व पशुधन प्रदर्शन कृषी महोत्सवात १०० पेक्षा जास्त कंपन्यांचा सहभाग असणार आहे. चर्चासत्रासाठी विशेष कक्ष तर पशुपक्षी व प्राणी प्रदर्शन, फ्री फॅब्रिकेटेड स्टॉल्स, वैविध्यपूर्ण अवजारे, मान्यवरांच्या भेटी व मार्गदर्शन देखील होणार आहे. पिलरलेस दोन शामियान, परदेशी भाजीपाला, विविध मनोरंजनांच्या कार्यक्रमांची मेजवानी देखील असणार आहे.
















