तळवली (वार्ताहर )- गुहागर तालुक्यातील पागांरी तर्फे हवेली सडेवाडी भुरकुंडा रस्ता ग्रामीण मार्ग 54 या रस्त्यावर गावचे सरपंच नुर महमद दळवी यांनी दगडी बांध घालून रस्ता अडवल्याने या परिसरातून संताप आणि नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
या गावच्या रस्त्यासाठी जिल्हा नियोजन अतर्गत 10 लाखाचा निधी मंजूर आहे माञ या कामाला पागांरी तर्फे हवेलीचे सरपंच नुर महमद दळवी वेळोवेळी विरोध करुन निधी दुसऱ्या ठिकाणी खर्ची करण्याचा प्रयत्न करत असल्याचा ग्रामस्थाचा आरोप आहे. या विरोधात पंचायत समिती गटविकास अधिकारी तहसीलदार पोलीस ठाण्याला ग्रामस्थांनी निवेदन दिले आहेत. या रस्त्यासाठी भाजपचे केदार साठे व जिल्हा नियोजन समिती सदस्य निलेश सुर्वे यांच्या प्रयत्नाने निधी मंजूर झाला ग्रामपंचायतीवर ठाकरे सेनेचे सरपंच दळवी असुन ते हे विकास काम करण्याच्या मानसिकतेत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.
या आधी या रस्त्यावर दगड रचून हा रस्ता अडविण्यात आला होता. मात्र तो रस्ता ग्रामस्थांनी दगड बाजूला करून मोकळा केला होता.मात्र पुन्हा एकदा दिनांक 18/12/2025 रोजी सरपंच नुर महमद दळवी यांनी हा रस्ता जाभा दगड रचुन बंद केला आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थांच्यात संतापाची लाट पसरली आहे. लवकरात लवकर शासनाने रस्त्यावरील अतिक्रमण हटवुन रस्ता खुला करावा हि जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे.जर सरपंच गावच्या विकास कामात अडथळा निर्माण करून अशा प्रकारे रस्ते अडवत असतील तर सर्वसामान्य व्यक्तींनी न्याय कोणाकडे मागावा.? असा प्रश्न त्या निमित्ताने उभा राहिला आहे.जिल्हा प्रशासन आणि तालुका प्रशासन याबाबत नक्की कोणती भूमिका घेते याकडे सर्वसामान्य नागरिकांच्या लक्ष लागून राहिले आहे.















