चिपळूण – रत्नागिरी जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण अशा चिपळूण शहरातील प्रभाग क्रमांक ७-अ मधील नगरसेवक पदाची निवडणूक अक्षरशः शेवटच्या मतापर्यंत श्वास रोखून धरणारी ठरली. या अटीतटीच्या आणि अत्यंत चुरशीच्या लढतीत भाजपचे उमेदवार संदीप भिसे यांनी अवघ्या एका मताच्या फरकाने विजय मिळवत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली.
चिपळूण ; नगरपरिषद निवडणुकीत मतदारांनी दिले दिग्गजांना नारळ
भाजपचे संदीप भिसे यांना ४१८ मते मिळाली, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे उमेदवार सुनील रेडीज यांना ४१७ मते मिळाली. केवळ एका मताने पराभव स्वीकारावा लागल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात निराशेचे वातावरण पसरले, तर भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. मतमोजणीच्या प्रत्येक फेरीत दोन्ही उमेदवारांमध्ये अत्यंत कमी फरक असल्याने तणावाचे वातावरण होते. अखेर अंतिम निकाल जाहीर होताच संदीप भिसे यांच्या समर्थकांनी जल्लोष करत ‘एक मत – पण विजय आपलाच’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. प्रभागात फटाक्यांची आतषबाजी आणि कार्यकर्त्यांचा जल्लोष पहायला मिळाला.
या निकालाने प्रभाग ७-अ मध्ये भाजपने आपले अस्तित्व अधिक बळकट केले असून, एका मताचे महत्त्व किती निर्णायक ठरू शकते, हे या निवडणुकीतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. प्रत्येक मत अमूल्य असल्याचा संदेश या निकालाने मतदारांपर्यंत पोहोचवला आहे. एका मताने मिळालेला हा विजय चिपळूणच्या राजकारणात दीर्घकाळ चर्चेचा विषय ठरणार आहे.















