चिपळूण ; चिपळूण तालुक्यातील तळवडे येथे अज्ञाताने लावलेल्या बॅनरची जोरदार चर्चा होत आहे. या गावात इंटरनेटची सुविधा नसल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागते. शिक्षण, आरोग्य, बँकिंग, सरकारी सेवा अशा प्रत्येक बाबतीत इंटरनेट अत्यावश्यक असतानाही एकाही टेलिकॉम कंपनीचा येथे मोबाईल टॉवर उपलब्ध नाही. त्याचे पडसाद आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक निमीत्ताने फलकाच्या रूपाने उमटले आहेत. बॅनरवरील मजकूर “पुढाऱ्यांनी फुकट गावात फिरू नये, आमच्या भावना समजून घ्या… नेट द्या, मत घ्या!” असा स्पष्ट संदेश देतो. याखाली “तळवडे गाव म्हणतंय आता गावात इंटरनेट कनेक्शन पाहिजेच!” असा इशाराही दिला आहे.
सध्या निवडणुकांचा काळ सुरु असल्याने अनेक राजकीय पुढारी गावभेटी घेत आहेत. मात्र, स्थानिक नागरिकांनी आता विकासकामांशिवाय कोरी आश्वासने नाकारायची भूमिका घेतल्याचं या बॅनरवरून स्पष्ट दिसत आहे. गावातील तरुण, विद्यार्थी, शेतकरी आणि नोकरदार यांना इंटरनेटच्या अभावामुळे दररोज समस्या भोगाव्या लागतात. काही अत्यावश्यक माहिती पोहचवणे खूप अडचणी येत आहेत, एखादी दुःखत माहिती वेळेत न पोहचणे अशा अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ऑनलाईन शिक्षण, शासनाच्या योजना, बँक व्यवहार, रोजगाराच्या संधी या सर्व गोष्टींसाठी इंटरनेट आवश्यक असतानाही गावात आजही डिजिटल अंध:कार आहे. हा बॅनर कोणी लावला हे अद्याप स्पष्ट झालेलं नसून, स्थानिक पातळीवर यावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. बॅनर बाबत तळवडे सरपंच यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
















