गुहागर – गुहागर क्यू फ्लॅग दर्जासाठी येथील नगरपंचायतीच्या पुढाकारातून गुहागर समुद्र किना-यावर स्वच्छता अभियान राबवण्यात आले. दीड तासांमध्ये केलेल्या स्वच्छतेतून समुद्रकिनाऱ्यावरील सुरुबन व समुद्रकिनारा, पोलीस परेड मैदान चकाचक करण्यात आले. तक्रार निवारण केंद्र व्हाट्सअॅप ग्रुपवर मार्गदर्शन करणारे स्वच्छतेची अभ्यासपूर्ण शिकवण देणाऱ्यानी राबवण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेकडे मात्र पाठ फिरवली. दरम्यान, गुहागर समुद्रकिनाऱ्याबरोबर शहरातही स्वच्छता राहावी यासाठी नगरपंचायत कडक निर्बंध लावण्याच्या तयारीत आहे.
ब्ल्यू फ्लॅग दर्जासाठी मंगळवारी सकाळी साडेसात वाजता समुद्रकिनारी व पोलीस परेड मैदान या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली होती. याकरिता मुख्याधिकारी यांनी नगरपंचायत तक्रार निवारण केंद्र या ग्रुपवरून स्वच्छतेबाबत सर्वांना आवाहन केले होते. नगरपंचायतीचे सर्व अधिकारी कर्मचारी तसेच गुहागर हायस्कूलचे मुख्याध्यापक सुधाकर कांबळे,शिक्षक, निवृत्त पोलीस निरीक्षक प्रदीप मिसर मुख्याधिकारी स्वप्निल चव्हाण, विद्यार्थी वर्ग यांनी या स्वच्छतेमध्ये सहभाग नोंदविला यावेळची स्वच्छता मोहीम छायाचित्रांसाठी नाही तर प्रत्यक्ष कामासाठीच राबवण्यात आल्याचे दिसून आले. परंतु समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर टाकण्यात येणारा हा कचरा प्लास्टिक बाटल्यांच्या स्वरुपात असल्याने याविषयी मुख्याधिकारी यांनी यापुढे कडक धोरण घेतले आहे.मुख्याधिकारी चव्हाण यांनी समुद्रकिनाऱ्यावरील अस्वच्छतेबाबत नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात प्लास्टिक बाटल्या आढळल्या. तसेच खाण्याचे पदार्थ, काचेच्या बाटल्या असा कचरा पहावयास मिळाला. स्थानिक दुकानदारांनी आपल्या दुकानासमोर कचऱ्यासाठीचे डबे ठेवलेले दिसले नाहीत. यामुळे शहरातील सर्व दुकानदार, हॉटल पोलीस मैदानावरील सर्व दुकानदार यांना सूचना वजा नोटीस काढण्यात येईल. सुका कचरा, ओला कचरा टाकण्यासाठी कोणती व्यवस्था केलेली आहे. रोज ओला, सुका कचरा गोळा केला जातो का, याविषयी माहिती द्यावी. रस्त्यावर अथवा घराच्या बाहेर कचऱ्याचा डबा ठेवून जाऊ नये, असे
आवाहन त्यांनी केले.
घंटागाडी आल्यानंतर नागरिकांनी त्यातच ओला सुका कचरा देणे अपेक्षित आहे. ज्या दुकानात फक्त सुका कचरा जमा होतो. उदा. स्टेशनरी, व्हरायटी स्टोअर यांनी सुक्या कचऱ्यालाठी काय योजना केली त्याबाबत माहिती द्यावी. तसेच शहरात प्लास्टिक बंदी आणि किनाऱ्यावर इतर साहित्य नेण्याबाबत कडक धोरण राबविण्यात येईल. यासाठी शहरवासियांनी आणि व्यावसायिकांनी सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकाऱ्यांनी केले आहे.
















