चिपळूण – चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाणे खुर्द येथील ग्रामपंचायतीचा अजब कारभार प्रशासना समोर मांडून सुद्धा प्रशासन कोणतीच कारवाई करत नसल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
मार्गताम्हाणे खुर्द या ग्रामपंचायतीमध्ये एकूण सात सदस्य आहेत. या ग्रामपंचायतीमध्ये ऑगस्ट 2023 ते डिसेंबर 2024 या कालावधीत एकही ग्रामसभा न झाल्याची तक्रार येथील ग्रामस्थ राजेंद्र कोतवडेकर, दीपक चव्हाण यांनी केली आहे. जर या कालावधीत ग्रामसभा झालीच नसेल तर दीड वर्षातील जमा झालेल्या निधीचा उपयोग कुठे केला गेला.? संबंधित कालावधीमध्ये कार्यरत असणारे ग्रामसेवक व सरपंच यांच्यावर प्रशासनाने का कारवाई केली नाही.? असे अनेक प्रश्न विचारत येथील गग्रामस्थांनी जिल्हाधिकारी रत्नागिरी ,गटविकास अधिकारी चिपळूण यांच्याकडे जानेवारी 2025 मध्ये लेखी तक्रार केली आहे. अद्यापही या प्रकरणाबाबत शासनाने कोणतीही भूमिका किंवा कोणतीही कारवाई न केल्याने येथील ग्रामस्थांमधून संताप आणि नाराजी व्यक्त केली जात आहे. ज्या ग्रामसेवकाविरुद्ध ग्रामस्थांनी ग्रामसभा न घेतल्याची तक्रार केली आहे. तोच विद्यमान ग्रामसेवक अद्यापही या ग्रामपंचायतीवर कार्यरत आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी अशा ग्रामसेवकाला पाठीशी घालतात की काय..? याची चर्चा या परिसरात सुरू आहे.
या ग्रामपंचायतीच्या विकास कामासंदर्भात गटविकास अधिकारी ,चिपळूण विस्तार अधिकारी चिपळूण ,जिल्हा अधिकारी रत्नागिरी यांच्याकडे नागरिकांनी विकास कामे होत नसल्याची वेळोवेळी तक्रार केल्या आहेत. मात्र प्रशासन जाणून-बुजून या तक्रारींकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जात आहे. ज्यांनी तक्रार केली ते दीपक चव्हाण सध्या या ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत. सरपंच होण्याआधी त्यांनी हा विषय प्रशासनाकडे लावून धरला होता.
















