वाशिष्ठी डेअरीकडून शेतकऱ्यांची दीपावली गोड!… शेतकऱ्यांच्या खात्यात 78 लाख 56 हजारांचा बोनस जमा

0
1
बातम्या शेअर करा

चिपळूण – केवळ व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता शेतकऱ्यांचे नेहमीच हीत जपून काम करणाऱ्या वाशिष्ठी मिल्क अ‍ॅण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि. या दुग्धप्रकल्पातर्फे यावर्षीही दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळीचा गोडवा लाभला आहे. प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव यांनी 2024-25 या आर्थिक वर्षासाठी शेतकऱ्यांना एकूण 78 लाख 56 हजार 441 रुपयांचा दिवाळी बोनस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला आहे.


कोकणातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक-अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून चिपळूण तालुक्यातील पिंपळी येथे वाशिष्ठी डेअरीचा प्रकल्प साकारण्यात आला. श्री. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत यादव यांनी प्रकल्पाच्या चेअरमन पदाची जबाबदारी सांभाळत या प्रकल्पाला अल्पावधीतच महाराष्ट्रात नावलौकिक मिळवून दिले. केवळ व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता शेतकऱ्यांचे हित जपण्याचा प्रयत्न या प्रकल्पाच्या माध्यमातून केला जात आहे. वाशिष्टी डेअरीला दूध पुरवठा करणाऱ्या 7 हजार 542 शेतकऱ्यांना गतवर्षी 2023-24 मध्ये दिवाळीत 48 लाख 65 हजार 754 रुपयांचा बोनस वितरित करण्यात आला होता. यावर्षी शेतकऱ्यांची संख्या वाढून 13 हजार 546 इतकी झाली असून बोनस रक्कमही मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. या उपक्रमातून वाशिष्ठी डेअरीने शेतकऱ्यांच्या विश्वासाला आणि त्यांच्या परिश्रमांना दिलेला सन्मान अधोरेखित झाला आहे, अशी भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.


वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांचे श्रम, प्रामाणिकता आणि गुणवत्तापूर्ण दूधपुरवठा हेच वाशिष्ठी डेअरीचे सामर्थ्य आहे. हा दिवाळी बोनस म्हणजे त्यांच्या कष्टाची पोचपावती असून आपल्या शेतकऱ्यांचा दिवाळीचा आनंद अधिक गोड करण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आहे.”
दूध उत्पादक शेतकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत करत “वाशिष्ठी डेअरीने सदैव शेतकरीहिताला प्राधान्य दिले आहे,” अशा शब्दांत समाधान व्यक्त केले. या निर्णयामुळे परिसरातील दुग्ध व्यवसायाला अधिक बळ मिळेल आणि शेतकऱ्यांचा आत्मविश्वासही वाढेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here