चिपळूण – जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार, साप्ताहिक ‘कोकण एक्सप्रेस’ चे संपादक सतीश कदम यांनी आगामी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी निवडणुकीची तयारीही सुरू केली आहे.”चिपळूण शहरातील जनता नव्या पर्यायाच्या आणि नव्या चेहऱ्याच्या प्रतीक्षेत आहे. यावेळी नागरिकांची ही इच्छा पूर्ण होईल,” असे म्हणत कदम यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
चिपळूण नगरपरिषद साठी या वेळी नगराध्यक्ष पद सर्वसाधारण वर्गासाठी खुले झाले असून सुमारे साडेसतरा वर्षांनंतर या वर्गाला ही संधी प्राप्त झाली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांमध्ये इच्छुकांच्या चाचपणीला वेग आला आहे. महायुती, महाविकास आघाडी की स्वबळ हे चित्र अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, उमेदवारांची नावे आणि चर्चेची गती दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात पत्रकार सतीश कदम यांच्या प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात चांगलीच खळबळ माजली आहे.
सतीश कदम हे गेली ३५ वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेत कार्यरत आहेत. वार्ताहर, प्रतिनिधी, ब्युरो चीफ, आवृत्तीप्रमुख ते संपादक असा त्यांचा दीर्घ आणि अनुभवसंपन्न प्रवास आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी स्वतःचे स्वतंत्र चॅनल सुरू करून जनतेशी थेट संपर्क साधला आहे. चिपळूण शहर, तालुका आणि कोकण विभागातील सामाजिक, राजकीय आणि विकासविषयक विषयांचा त्यांना सखोल अभ्यास आहे. शहरात दीर्घकाळ वास्तव्य असल्याने स्थानिक प्रश्नांची उत्तम जाण आणि लोकांशी जवळचा संपर्क हे त्यांचे मोठे बळ मानले जाते. त्यांनी सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. वाशिष्टी नदी अभ्यास समिती वर राज्य शासनाने त्यांची नियुक्ती केली होती. तसेच गेली तीन वर्षे ते जलदूत म्हणून कार्यरत आहेत.
चिपळूणमध्ये अंमली पदार्थविरोधी सिटीझन मूव्हमेंट उभारून त्यांनी प्रशासनाला जागे केले. चिपळूण बचाव समिती आंदोलन, मराठा आरक्षण चळवळ, बलिकेवर झालेल्या अत्याचाराविरोधातील आंदोलन यांसह अनेक सामाजिक चळवळींचे त्यांनी नेतृत्व केले आहे.
त्यांच्या पत्नी अंजली कदम या महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत असून या दाम्पत्याचा सामाजिक वावर शहरभर ओळखला जातो.
सतीश कदम यांनी यावेळी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारीची चाचपणी सुरू केली असून शहरातील नागरिक व प्रतिष्ठित लोकांच्या भेटीगाठी सुरू आहेत.ते कोणत्या पक्षाकडून किंवा संस्थेच्या माध्यमातून निवडणूक लढवतील की अपक्ष म्हणून हे अद्याप स्पष्ट झाले नाही. तथापि, एक उच्चशिक्षित, अभ्यासू आणि जनतेशी निगडित नवा चेहरा म्हणून त्यांचा पर्याय मतदारांसमोर येण्याची शक्यता आहे.त्यामुळे चिपळूणच्या राजकीय वर्तुळात कदम यांच्या संभाव्य उमेदवारीची जोरदार चर्चा सुरु असून, येत्या नगराध्यक्ष निवडणुकीत त्यांच्याकडून नव्या राजकीय समीकरणांचा पाया रचला जाईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.