चिपळूण – चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या 32व्या वर्धापन दिनानिमित्त इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक महोत्सवात संस्थेचे अधिकारी, कर्मचारी तसेच वाशिष्ठी डेअरी परिवाराने जल्लोषात सहभाग घेतला. संगीत, नृत्य, नाट्य, हास्य आणि भावनांच्या अविष्काराने सजलेली ही संध्याकाळ संस्मरणीय ठरली!
सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालिका सौ.स्मिता चव्हाण यांच्या ‘ऐ मालिक तेरे बंदे हम…’ या गीताने झाली. त्यांनंतर चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे अधिकारी व कर्मचारी यांनी रंगमंचावर विविध सादरीकरणांद्वारे रंगत वाढत नेली. एकापाठोपाठ एक सादर झालेल्या गाणे, नृत्य, नाटिका, गटगान, विनोदी स्किट या सर्वांनी सभागृह दणाणून टाकले. गोंधळ, लावणी, रिमिक्स अशा अनेक बहारदार कार्यक्रमांनी उपस्थितांना ठेका धरायला लावला. संस्थेच्या विविध शाखांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वतःचे कलागुण सादर करत प्रेक्षकांची मनं जिंकली. नृत्यावरील तालबद्ध सादरीकरणांनी संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा कडकडाटासह जल्लोष झाला. वाशिष्ठी डेअरीच्या कर्मचाऱ्यांनी सादर केलेले नृत्य व गीत यांचे संयोजन कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.
या सांस्कृतिक कार्यक्रमातून प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कलात्मकता आणि एकजुटीचे दर्शन घडवले. सांस्कृतिक कार्यक्रमातून संस्थेतील आपुलकी, सहकार्य आणि संघभावनेचे दर्शन घडले. पतसंस्थेच्या प्रवासातील यशस्वी पावलांचा मागोवा घेणाऱ्या या कार्यक्रमात हशा, टाळ्या आणि आनंदाचा उत्सव फुलला होता.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. सुभाषराव चव्हाण साहेब, ज्येष्ठ संचालिका सौ. स्मिताताई चव्हाण, वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव, मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव, कु. स्वामिनी यादव यांच्यासह चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे सर्व संचालक, अधिकारी-कर्मचारी तसेच वाशिष्ठी डेअरीचे संचालक, अधिकारी-कर्मचारी आणि त्यांच्या परिवारांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
संस्थेच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या प्रवासात दाखविलेली कार्यतत्परता आणि एकोपा या सांस्कृतिक सोहळ्यातून स्पष्टपणे जाणवला. पतसंस्थेचा 32 वर्षांचा प्रवास केवळ आर्थिक सेवेत मर्यादित न राहता सामाजिक आणि सांस्कृतिक जाणीव जपणारा ठरला आहे. संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त रंगलेला हा बहारदार कार्यक्रम सर्वांसाठी एक अविस्मरणीय कलासंध्या ठरली.