चिपळूण – चिपळूण तालुक्यातील उमरोली जिल्हा परिषद गटात आतापासूनच राजकीय उलथापालथ सुरू झाली आहे. रामपूर जिल्हा परिषद गटातील माजी सदस्य व माजी महिला बालकल्याण सभापती ऋतुजा रुपेश खांडेकर , युवा नेते योगेश खांडेकर व अन्य 50 कार्यकर्त्यांनी रत्नागिरी येथील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात
पक्षप्रवेश केला. या मान्यवरांनी त्यांचे सन्मानपूर्वक स्वागत केले.
जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आरक्षण जाहीर होताच उमरोली गटात राजकीय वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. खांडेकर कुटुंबीय शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा यापूर्वीच सुरू होती. ऋतुजा खांडेकर यांचे दीर योगेश खांडेकर यांचा रामपूर विभागात चांगला जनसंपर्क आहे. त्यांच्या रूपाने एक तरुण नेतृत्व येथे उदयाला आले आहे. या वेळच्या निवडणुकीत योगेश खांडेकर उमरोली गटातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या या पक्षप्रवेशाने त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. यावेळी उमरोली गटातून अनेक तरुण विविध पक्षांच्या माध्यमातून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. मात्र अद्याप नावे समोर आलेली नसली तरी केवळ त्यांच्या उमेदवारीची चर्चा आहे मात्र योगेश खांडेकर यांच्या शिंदे गटातील पक्षप्रवेशाने या गटात पहिलाच उमेदवार जाहीर झाल्याचे सध्यातरी चित्र आहे.