दापोली – एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पांर्गत राष्ट्रीय पोषण महाअभियान २०२५ हर्णे बिटातर्फे आयोजित केलेल्या पौष्टिक पाककृती स्पर्धेमध्ये सुरेखा मारुती चौगुले यांनी प्रथम क्रमांक पटकावला. यावेळी पालक मेळाव्याचे देखील आयोजन करण्यात आले होते.
या अभियानामध्ये हर्णे बीट मधील एकूण २६ अंगणवाड्या सहभागी झाल्या होत्या. या पाककृती स्पर्धेत एकूण १४ महिला पालकांनी सहभाग घेतला होता. यावेळी पालकांनी नाचणीचे पदार्थ, कच्ची फळे त्यांचे सलाड, पालेभाज्या, मोड आलेले धान्य आदी वस्तूंपासून पौष्टिक पदार्थ बनवून आणले होते. या स्पर्धेत श्रावणी स्वप्नील मुरुडकर हिने द्वितीय तर वंदना धनाजी पावसे हिने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. सर्व विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
यावेळी आयोजित पालक मेळाव्यामध्ये प्रकल्प अधिकारी मानसी तुळसकर यांनी पोषण आहाराचे महत्व, स्तनदा माता व गरोदर माता यांची कशी काळजी घ्यावी याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच हर्णे ग्रामपंचायत सरपंच ऐश्वर्या धाडवे यांनी देखील योग्य मार्गदर्शन केले. उपसरपंच पूनम पावसे यादेखील उपस्थित होत्या. या स्पर्धेचे परीक्षण महसूल विभाग कर्मचारी राखी वेदपाठक व आदिशक्ती कमिटी अध्यक्षा सना काझी यांनी केले. या कार्यक्रमाला कर्दे, आसूद, मुरुड, सालदुरे, आंबवली, पाळंदे, हर्णे तसेच पाजपंढरी आदी बिटातील गावांतील अंगणवाड्याच्या अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस उपस्थित होत्या. सदरचा कार्यक्रम पार पाडण्यासाठी हर्णे मधील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी बहुमोल परिश्रम घेतले.