गुहागर- गुहागर तालुक्यातील वेलदूर येथील जानकी फार्म हाऊसमधून सुमारे ९ लाख ४५ हजार रुपये किमतीच्या ‘विक्रम’ कंपनीच्या ४५ सौरऊर्जा पॅनलची चोरी झाल्याचा प्रकार गुहागर पोलिसांनी उघडकीस आणला आहे. याप्रकरणी पोलिसांनी साताऱ्यातून दोन आरोपींना अटक केली असून, चोरीस गेलेला १०० टक्के मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले आहे.
वेलदूर येथील जानकी फार्म हाऊसच्या मोकळ्या व्हरांड्यातून काही दिवसापूर्वी हे पॅनल चोरीला गेले होते. याबाबत गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर, पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले यांच्या मार्गदर्शनाखाली गुहागर पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांनी तात्काळ तपास सुरू केला.
पोलीस निरीक्षक सावंत यांनी एक विशेष पथक तयार केले. या पथकात पोलीस उपनिरीक्षक संदीप भोपळे, पो.कॉ कुंभार, पो.कॉ शिंदे, पो.कॉ रोहीलकर आणि पो. कॉ घाटगे यांचा समावेश होता. या पथकाने संशयित व्यक्तींचा कसून मागोवा घेत तपास केला. या तपासणीमध्ये सातारा येथील अतुल अंबादास थोरात याने ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली. चौकशीत आरोपी अतुल थोरात याने चोरलेला सर्व मुद्देमाल त्याचा मित्र आणि सह-आरोपी अतुल सोमनाथ चौधरी (रा. खातगुण, ता. खटाव) याच्या मदतीने एका चारचाकी गाडीतून साताऱ्यात नेल्याची कबुली दिली. त्यांनी हा मुद्देमाल सातारा जिल्ह्यातील खातगुण, भांडेवाडी, गणपतीचा माळ या भागातील वन खात्याच्या जागेत लपवून ठेवला होता.
गुहागर पोलिसांनी तातडीने साताऱ्यात जाऊन दोन्ही आरोपींना अटक केली आणि सुमारे ९ लाख ४५ हजार रुपये किमतीचे सर्व ४५ सौरऊर्जा पॅनल जप्त केले. या कारवाईमुळे चोरीस गेलेला १००% मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींनी यापूर्वीही अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत का, याबाबत गुहागर पोलीस अधिक तपास करत आहेत.