गुहागर – गुहागर – चिपळूण मार्गावरील ओमकार मंगल कार्यालयात कामाला असणाऱ्या एका तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार नुकताच उघड झाला. त्यामुळे या परिसरात एकच खळबळ मारली. या तरुणाने आत्महत्या केली की त्याचा घातपात झाला याबाबत सध्या या परिसरात एकच चर्चा सुरू आहे.
ओमकार मंगल कार्यालय येथे कामाला असणाऱ्या स्वप्नील कानसे या व्यक्तीने ही आत्महत्या केली. यापूर्वी तो खेड तालुक्यातील लोटे येथे मामाकडे रहायला होता. यानंतर तो चिखली येथील मंगल कार्यालयात अडीच वर्षापूर्वी कामाला लागला होता. नेहमीप्रमाणे सकाळी ८ वाजताच्या सुमारास स्वप्नील याने सर्व कामगारांना चहा दिला आणि ९ वाजता तेथील एका खोलीत गळफास लावल्याच्या स्थिती आढळला. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली की त्याचा घातपात याबाबत या परिसरात चर्चा सुरू आहे.
घटनास्थळी दारुची बाटली, खाद्यपदार्थ पोलिसांना सापडले. त्याचा मृतदेह चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. स्वप्नील हा विवाहित होता. त्याच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करीत आहेत.