चिपळूण — खेड जेसीआय तर्फे चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा वाशिष्ठी डेअरीच्या मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना प्रशांत यादव यांना जेसीआय ‘सहकार गौरव २०२५’ पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराबद्दल सौ. स्वप्ना यादव यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
जेसीआय खेडच्या वतीने जेसी सप्ताह साजरा केला जातो. याच निमित्ताने खेड आणि परिसरातील विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नागरिकांचा पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. यामध्ये चिपळूण नागरीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा वाशिष्ठी डेअरीच्या मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांना जेसीआय ‘सहकार गौरव २०२५’ पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते नुकतेच सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार सोहळा खेड शहरातील स्वर्गीय मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र येथे पार पडला.
चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था मुख्य कार्यकारी अधिकारी व वाशिष्ठी डेअरी मुख्य प्रवर्तक या दुहेरी जबाबदारी संभाळतांना सौ. स्वप्ना यादव यांनी सहकारात मोठे योगदान दिले आहे. यामध्ये महिला सक्षमीकरण, बचत गटांना प्रोत्साहन, महिला व तरूणींना सक्षम रोजगार, शेतकरी बांधवांसाठी कृषी प्रदर्शन, आरोग्य शिबिरे, विविध सांस्कृतिक स्पर्धा, लोकोपयोगी उपक्रम राबविले आहेत. याच कामाची दखल घेऊन जेसीआय समूहाने जेसीआय ‘सहकार गौरव २०२५’ हा पुरस्कार प्रदान करून यादव यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली आहे. या पुरस्काराने सहकार व सामाजिक क्षेत्रातील कामाची आणखी जबाबदारी वाढली आहे. पुढील काळात सहकारात आणखी मोठे योगदान देऊन सहकार चळवळ अधिक सक्षमतेने पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही दिली आहे.
यावेळी जेसीआय इंडिया विभाग ११ चे विभागीय अध्यक्ष जेएफडी शाबा गावस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जेसीआय खेडचे अध्यक्ष जेएफडी अमर दळवी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. आपल्या मनोगतात जेसीआय खेड गेली ४३ वर्षे प्रत्येक क्षत्रामध्ये कार्यरत करत असून खेड वासियाना हवाहवासा वाटणारा जेसीआय फेस्टिवल नव्या जागेत वर्षाच्या सुरुवातीला करेल असे आश्वासन दिले.
विभागीय अध्यक्ष जेएफडी शाबा गावस यांनी जेसीआय खेड चे कौतुक करत जेसीआय ही प्रशिक्षणमिभूक संस्था महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त ठिकाणी स्थापन करण्यासाठी काम चालू आहे व आपण सर्वानी सहकार्य करा, असे आवाहन केले.
कार्यक्रमप्रसंगी झोन ११ माजी अध्यक्ष जेएफडी अतुल गोंदकर , रोटरी क्लब अध्यक्ष मंदार संसारे, लायन्स क्लब अध्यक्ष महेंद्र शिरगावकर, शिवसेना खेड शहर प्रमुख कुंदन सातपुते , राष्ट्रवादी शहर अध्यक्ष अनिल सदरे, न्यानदीप चेअरमन अरविंद तोडकरी, रोटरी स्कूल चेअरमन बिपिन पाटणे , चिपळूण नागरी पतसंस्था, रोटरी क्लब खेड , एलएलटी स्कूल यांचे कर्मचारी व पदाधिकारी बाबाशेठ मित्रमंडळ सभासद खेड मधील नागरिक पत्रकार बंधू जेसीआय अलुमनी महाराष्ट्र रिजनल चेअरमन , जेसीआयचे खेड चे माजी अध्यक्ष सभासद आणि परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभारप्रदर्शन, माजी विभागीय अध्यक्ष जेसीआय सेनेटर अमोल शिरसागर, कार्यक्रम प्रमुख जेसी अमित नामुष्टे यांनी केले .