रत्नागिरी – रत्नागिरी येथील मिरजोळे येथील तरुणीचा तिच्याच प्रियकराने आंबा घाटात खून करून मृतदेह दरीत फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या दहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या या तरुणीचा शोध घेत असताना हा प्रकार उघडकीस आला. रत्नागिरी पोलिसांनी संशयित प्रियकराला ताब्यात घेतले असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात तिघांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
मृत तरुणीचे नाव भक्ती जितेंद्र मयेकर (वय २२, रा. मिरजोळे) असे असून संशयित प्रियकराचे नाव दुर्वास पाटील राहणार खंडाळा असे आहे. दोघांची ओळख काही महिन्यांपूर्वी फेसबुकवर झाली होती. ओळखीचे रूपांतर हळूहळू प्रेमसंबंधात बदलली; मात्र कुटुंबीयांचा विरोध आणि परस्परांतील वादामुळे या नात्यात तणाव निर्माण झाला होता.
प्राथमिक तपासात असे दिसून आले की, वादानंतर दुर्वास पाटील याने भक्तीला भेटण्यासाठी बोलावले. खंडाळा येथे तिचा खून करून तिला आंबा घाटात टाकण्यात आल्याचे समजत आहे. मात्र निघृण खून करून ही दुर्वास हा सर्वामध्ये मिळून मिसळून वावरत होता जणू काही घडलेच नाही. मात्र नुकत्याच मिळालेल्या माहिती नुसार त्याचे लग्न ही ठरल्याचे समजते. त्यानुसार तो ठरलेल्या मुलीचे तो फोटो स्टेटस वर ठेवत होता. यातून भक्ती आणि दुर्वास यांच्यात खटके उडत होते. आणि यातूनच खून करण्यात आला असावा अशी चर्चा परिसरात आहे.
भक्ती ही १० दिवसांपूर्वी घरातून बेपत्ता झाली होती. कुटुंबीयांनी तत्काळ पोलिसात तक्रार दाखल केली होती. तपासादरम्यान तिचे सोशल मीडियावरील संबंध उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी संशयित दुर्वासला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली; परंतु पोलिसांच्या कठोर चौकशीनंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
शनिवारी पोलिस आणि कुटुंबीयांनी आंबा घाटात शोध घेतला असता दरीत भक्तीचा मृतदेह सापडला. चेहरा विद्रूप झाल्यामुळे ओळख पटवणे कठीण होते; या घटनेमुळे मिरजोळे आणि खंडाळा परिसरात शोक व संतापाचे वातावरण पसरले आहे.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. गुन्हा अन्वेषण पथक या प्रकरणाचा सखोल तपास करीत असून आरोपीवर कठोर कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.