दापोली- मैत्री एकीशी आणि साखरपुडा दुसऱ्या मुलीशी करणे दापोली तालुक्यातील मुरुड येथील एका मुलाला चांगलेच भोवले आहे. त्याच्या विरोधात दापोली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या मैत्रिणीने दापोली पोलीस ठाणे गाठून त्या तरुणाविरोधात तक्रार दिली आहे.
दापोली तालुक्यातील मुरुड खालची पाखाडी येथील अद्वैत प्रमोध जोशी याची शेजारील गावातील एक मुलगी दापोली येथे ११ वीत शिकत असताना तिच्याशी ओळख झाली. त्यानंतर २०२३ मध्ये अद्वैतने तिला माझ्याशी लग्न करशील का असे विचारले. अद्वैतने या मुलीशी मी तुझ्याशी लग्न करणार असल्याचे सांगत तिच्याशी मैत्री केली व एकदा तिला जेवणासाठी नेवून परत येत असताना तिच्या मनाला लज्जा वाटेल असे वर्तन करून तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी केली. मात्र त्या मुलीने त्याला नकार दिला. त्यानंतर मी तुझा होणारा नवरा असून तुझे फोटो मला पाठव असे सांगत या मुलीकडे शरीर संबंध ठेवण्याची अद्वैतने मागणी केली होती. मात्र त्या मुलीने नकार दिला. २७ऑगस्ट रोजी अद्वैतने दुसऱ्या मुलीशी साखरपुडा केल्याचे फोटो या मुलीने पाहिल्यावर तिने तडक दापोली पोलीस ठाणे गाठले व तिने अद्वैत विरोधात लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक व मानसिक त्रास देत फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली. यावरून संशयित अद्वैत प्रमोध जोशी विरोधात गुन्हा दाखल केला असून तपास उपनिरीक्षक चव्हाण करत आहेत.