चिपळूण – राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव यांचा भाजपात प्रवेश निश्चित झाला आहे. दिनांक १९ ऑगस्ट रोजी मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, आ. चंद्रकांत पाटील यांसह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार असल्याची माहिती मत्स्यबंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांनी चिपळूणमधील वाशिष्ठी डेअरी प्रकल्पात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका स्वबळावर लढवाव्यात अशी कार्यकर्त्यांची भावना असून, त्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचवल्या जातील, असे राणे म्हणाले. “आपली खरी ताकद कधी कळणार?” असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच, २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचाच आमदार असेल, असा विश्वास व्यक्त करत राणे म्हणाले की, “प्रशांत यादव रत्नागिरी जिल्ह्यातील मोठे नेतृत्व आहे. कार्यकर्ता म्हणून नाही, तर नेते म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून त्यांनी मोठं काम केलं आहे, अनेकांना रोजगार दिला आहे. सहकाराच्या क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे असा नेता आमच्या पक्षात आला, तर निश्चितच आम्हाला फायदा होईल.”भाजपत प्रशांत यादवांचा प्रवेश १९ ऑगस्ट रोजी नरिमन पॉइंट येथील भाजप प्रदेश कार्यालयात होईल. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे आणि इतर नेते उपस्थित राहणार आहेत या वेळी उपस्थित माजी आमदार डॉ. विनय नातू, जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, राजेश सावंत, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव यांच्यासह नेते आणि कार्यकर्ते देखील उपस्थित होते.
नितेश राणे यांनी याशिवाय २०२४च्या विधानसभा निवडणुकीत प्रशांत यादव फक्त सहा हजार आठशे मतांनी पराभूत झाले होते, हे सांगत २०२९च्या विधानसभा निवडणुकीत भाजप निश्चितच विजयी होईल असा विश्वास व्यक्त केला.राज्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रशांत यादवांच्या प्रवेशामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, या सोहळ्यासाठी राजकीय व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती अपेक्षित आहे.