गुहागर – गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील अय्यंगार बेकरी मधून आणलेल्या पेढा खाल्ल्याने वेदांत ज्वेलरीमध्ये काम करणाऱ्या ११ महिलांना विषबाधा झाली. यावेळी त्वरित त्यांना शृंगारतळीतील प्रो लाईट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
ग्रामपंचायत पाटपन्हाळेच्या पाठीमागे एका इमारतीत वेदांत ज्वेलरीचे मालक बळीराम साळवी यांनी महिलांच्या हाताला काम मिळावे म्हणून मुंबईहून ज्वेलरीचे मटेरियल आणून काम देत होते. श्रावण महिना असल्याने एका महिलेने सकाळी ११ च्या सुमारास अय्यंगार बेकरी येथून पेढे आणले व त्यातील अर्धा- अर्धा पेढा महिलांना दिला. काही वेळाने येथील महिलांना चक्कर व उलटी होण्यास सुरुवात झाली. त्वरित त्यांना शृंगारतळी येथील प्रो लाईट हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. यामध्ये स्वप्नाली पवार, प्रतीक्षा मोहिते, पूजा मोहिते, वृषाली पवार, विदिशा कदम, सोनाली नाईक, मधुरा घाणेकर, निकिता गमरे, प्रिया मोहिते, संजना गिरी, व मानसी शिगवण या महिला आहेत. या महिलांनी श्रावणी सोमवारचा प्रसाद म्हणून अर्धा- अर्धा पेढा खाल्ला व काही वेळातच त्यांना चक्कर व उलट्या होण्यास सुरुवात झाली. या ठिकाणी उपस्थित असलेले डॉक्टर राहुल चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता सर्व महिलांची प्रकृती चांगली असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या या प्रकरणी गुहागरचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरु आहे.