चिपळूण – चिपळूण तालुक्यातील धामणवणे येथे झालेल्या निवृत्त शिक्षिकेच्या खुनाने अवघा महाराष्ट्र हादरला होता. 68 वर्षीय वर्षा जोशी यांच्या हत्या प्रकरणाची गंभीर दखल घेत चिपळूण पोलिसांनी युद्ध पातळीवर तपास सुरु केला. आणि चिपळूण पोलिसांनी दमदार कामगिरी करत गोंधळे गावातील जयेश गोंधळेकर या तरुणाला ताब्यात घेत हा खून कशासाठी केला हे शोधून काढले. सध्या चिपळूण पोलिसांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. या तरुणाने दागिने आणि पैशांसाठी खून केल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे.
जयेश गोंधळेकर हा काही वर्षांपूर्वी सातारा येथे हे नोकरी करत होता. तो मूळ जोशी यांच्या गोंधळे गावातीलच गोंधळेकर कुटुंबातील आहे. तो सध्या चिपळूण परिसरात राहत होता. मात्र नोकरी धंदा करत नव्हता. त्यामुळे पैशांसाठीच त्याने हा खून केल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
निवृत्त शिक्षिकेच्या हत्येची दुर्दैवी घटना गुरुवारी सकाळी समोर आली होती. ही घटना घडल्याचं कळताच तात्काळ जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर जिल्हा पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला होता. आरोपी जयेशने खून प्रकरणाचे पुरावे नष्ट करत, कोणालाही याबद्दल कळू नये यासाठी कॉम्प्युटर हार्डडिस्कही गायब केल्या होत्या. आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून अजून एका आरोपीचा शोध सुरू असल्याचं जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाडे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.