गुहागर – जिल्हा नियोजन विभागाच्या निधी वाटपावरुन माजी आ.डाँ. विनय नातू खरं तेच बोलले आहेत. प्रत्येक तालुक्याला सम प्रमाणात निधी मिळावा, यासाठी ते बोलले मात्र, पालकमंत्र्यांनी यावर मीडियासमोर कोण विनय नातू असे विधान केले ते चूकच आहे, असे स्पष्ट मत भाजपा जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांनी गुहागर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केले.
जिल्हा नियोजनच्या निधीतील फरक डाँ. नातू यांनी माहिती अधिकारात समोर आणला आहे. डाँ. नातू यांनी स्वतःला काही पाहिजे किंवा कुठले पद पाहिजे म्हणून ते बोलले नसून आपल्या तालुक्याला विकास निधी मिळावा ही त्यांची प्रामाणिकपणे भूमिका आहे. विधानसभा निवडणुकीत शृंगारतळी येथील प्रचारसभेत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डाँ. नातू यांना व्यासपीठावर जवळ बोलावून त्यांच्यासारखा स्वच्छ प्रतिमेचा व त्यांना
उमेदवारी डावलूनसुध्दा उमेदावाराला सहकार्य करणारा नेता म्हणून त्यांचा जाहीर सभेत गौरव केला, त्यामुळे डाँ. नातू यांच्यावर टीका करताना विचार केला पाहिजे, असेही मोरे यांनी स्पष्ट केले.
येथील स्थानिक आमदारांनी डाँ. नातू यांना तुच्छ म्हणून हिणवले मात्र, त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यांना २०२१ मध्ये मंत्रिपद मिळाले नाही यावरुनच त्यांना मिळालेली वागणूक व तुच्छपणा दिसून आला. ते गेले १५ वर्षे ते केवळ भाजपवरच आरोप करत आहेत. तालुक्यातील खोतकी नष्ट केल्याच्या आरोपाचे खंडन करताना मोरे म्हणाले, ज्या डाँ. तात्यासाहेब नातू यांनी स्वतः शाळा काढून त्या संबंधित गावांना हस्तांतरीत केल्या त्या त्यांनी स्वतःच्या नावावरुन करुन आपली खोतकी गाजवली असती मात्र, त्यांनी तसे केले
नाही. त्यामुळे खोतकीचा आरोप करणाऱ्यांनी स्वतःकडे बघावे, असेही स्पष्ट केले.
गुहागर तालुक्यात भाजपचे सर्वाधिक कार्यकर्ते आहेत. त्यामुळे वरिष्ठांच्या निर्णयानुसार, जसा लढण्याचा आदेश असेल तसे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लढून याची ताकद आम्ही दाखवून देणार आहोत.या पत्रकार परिषदेला भाजपा तालुकाध्यक्ष अभय भाटकर, माजी तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, वसंत ताम्हणकर , उदय घाग, प्रांजली कचरेकर , अपूर्वा बारगुडे, विनायक सुर्वे, आशिष विचारे, सचिन ओक , नरेश पवार यांच्यासह अन्य तालुका
कार्यकारिणीचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.