रामदास कदम हे वाघ नव्हे बिबट्या आहेत.. आमदार भास्कर जाधव यांची बोचरी टीका ….

0
305
बातम्या शेअर करा

गुहागर – रामदास कदम हे वाघ नव्हे बिबट्या आहेत. ते माझ्याविरोधात बोलताना भास्कर जाधव माझ्या पाया पडतात असे सांगतात मात्र, तेच माझ्या दोनवेळा पाया पडल्याची टीका आ. जाधव यांनी वेळणेश्वर जिल्हापरिषद गटातील मेळाव्यात केली.

वेळणेश्वर जि.प. गटातील हेदवी हेदवतड येथील खारवी समाज भवन येथे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचा मेळावा पार पडला. यावेळी आ. जाधव यांनी शिंदे गटात प्रवेश केलेल्या पदाधिकारी व विशेष करुन रामदास कदम यांचा समाचार केला. ते म्हणाले, मी राष्ट्रवादीत असताना रामदास कदम मला तुमच्या पक्षात घ्या व कँबिनेट मंत्रीपद मिळवून द्या. तसेच माझ्या मुलगा योगेश याला पदरात घ्या अशी विनवणी करत माझ्या दोनवेळा पाया पडले होते. त्यामुळे त्यांनी माझ्याविरोधात बोलताना विचार करावा, अशा शब्दात त्यांनी टीका केली.

वेळणेश्वर व पडवे गटातील गेलेले नेत्रा ठाकूर व महेश नाटेकर हे पदाधिकारी केवळ स्वार्थासाठी गेले आहेत. नेत्रा ठाकूर यांना जिल्हा नियोजन मंडळावर जायचे असल्याने त्यांनी हा खटाटोप केलाच शिवाय वेळणेश्वर गटात पुरुष आरक्षण असताना त्यांनी या गटात दावेदार उमेदवार असलेल्या विलास वाघे व समीर डिंगणकर यांनादेखील आपल्याबरोबर पक्षप्रवेश घडवून त्यांना संपवलेच आहे. २०१७ मध्ये राष्ट्रवादीत मी असताना ठाकूर यांना मीच नियोजन मंडळावर घेतले होते मात्र, त्याचे श्रेय पालकमंत्र्यांना देत आहेत. याचाच अर्थ त्यांचे मेतकुट यापूर्वी जमले असावे आणि आता त्यांनी हा प्रवेश केला असावा, अशी शंका आ. जाधव यांनी व्यक्त केली.

मी वेळणेश्वरची खोती संपवली म्हणून आज मला संपविण्याचा प्रयत्न झाला असून कुणाचा बाप आला तरी मी संपणार नाही उलट मीच त्यांना संपवेन, असा इशारा आ. जाधव यांनी विरोधकांना दिला. आज जो खारवी समाज त्यांच्याबरोबर गेला आहे त्याच खारवी समाजाचे वेळणेश्वर येथील खारवी सभागृह पाडण्यासाठी नवनीत ठाकूर यांनी त्यावेळी संबंधित विभागाकडे तक्रार अर्ज केला होता. आता सीआरझेडच्या नियमावलीमुळे हे सभागृह पाडण्याची नोटीस आली असून ते वाचविण्यासाठी मीच उपयोगी येणार असल्याचे नमूद केले. साखरीआगर जेटीसाठी साडेआठ कोटीचा निधी मी मंजूर करुन आणला आहे. तिचे बांधकाम मीच पूर्णत्वास नेणार आहे. वेळणेश्वर गटातील धूपप्रतिबंधक बंधारे वा रस्ते असोत ही कोटीची कामे मीच मंजूर करुन आणली असून ही कामे थांबवायला मला वेळ लागणार नाही. तुमची गाठ माझ्याशी आहे हे विसरु नका, असा इशारा त्यांनी दिला.

पडवे मोहल्ल्यात रस्ता जाण्यासाठी कोणीही जागा देत नव्हते. मात्र, मी तेथील हिंदू लोकांच्या विरोधात जाऊन तेथील रस्ता करुन दिला. मंत्री असताना मच्छिमारांच्या घराखालच्या जमिनी कायम असण्याचा विषय असो, त्यांच्या कोणत्याही नुकसानभरपाईचा विषय असो या सर्व समस्या मी सोडविल्या आहेत. मी गुहागरमध्ये सुरुवातीला आलो तेव्हा येथे असा कोणता विकास होता हे मला सोडून जाणाऱ्यांनी सांगावे, येथील विकास हा केवळ माझ्यामुळेच झाला आहे, असेही आ. जाधव यांनी नमूद केले.

पक्षप्रवेश कार्यक्रमाला येथे उपमुख्यमंत्री, पालकमंत्री आले. त्यांच्यासमोर पक्षप्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांनी येथील बेरोजगारीचा व उद्योग-व्यवसाय उभारणीसाठी मुद्दा उपस्थित केला. मात्र, राजेश बेंडल यांच्या प्रचारसभेला आलेल्या एकनाथ शिंदे यांनी येथील कोणत्याही प्रकल्पाविषयी वाच्यता केली नाही. त्यामुळे हा प्रश्न विचारणारे पदाधिकारी हे खुळचट आहेत अशीही टीका आ. जाधव यांनी केली. या सभेला जिल्हा संपर्कप्रमुख सहदेव बेटकर, तालुकाप्रमुख सचिन बाईत, अरुणा आंब्रे यांच्यासह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. या मेळाव्याला हजारो जनसमुदाय उपस्थित असतो. बसायला सभागृहही कमी पडल्याचे दिसून आले.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here