संगमेश्वर- कोंबड्यांची शिकार करण्यासाठी खुराड्यात गेलेला बिबट्या हा त्याच खुराड्यात अडकल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील तुरळ सांगडेवाडीत रविवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. मधुकर कुंभार यांच्या कोंबड्यांच्या खुराड्यात हा बिबट्या अडकला. वनविभागाने या बिबट्याला पिंजऱ्याच्या सहाय्याने जेरबंद केले. बिबट्याला बघण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.
तुरळ येथील मधुकर कुंभार यांच्या राहत्या घराचे मागे असलेल्या कोंबड्याच्या खुराड्यात बिबट्या शिरल्याची माहिती मनसे जिल्हाध्यक्ष श्री जितेंद्र चव्हाण यांनी परिमंडळ वनअधिकारी संगमेश्वर देवरुख यांना दिली.मिळालेली माहिती वरिष्ठांना देऊन सर्व स्टाफ रेस्क्यू टीम पिंजरा व इतर साहित्य सह जागेवर जाऊन खात्री करता सदरचा बिबट्या कोंबड्यांच्या खुराड्यात अडकलेला आढळून आला.
वनविभागाचे कर्मचारी व पोलीस कर्मचारी यांनी गर्दी पांगवण्याचे काम केले. तद्नंतर सदर कोंबड्याचे पोल्ट्री फार्मचे सभोवार योग्य ती खबरदारी घेऊन शेडनेट लावले. कोंबड्याचे पोल्ट्रीचे मुख्य दरवाजाचे तोंडावर पिंजरा लावुन वरील भागात लाकडी फळया मारल्या. कोंबड्याचे पोल्ट्री फार्म मध्ये असलेल्या चार कंपार्टमेंट मध्ये फिरत असलेल्या बिबट्याला योग्य ती खबरदारी घेवुन अडीच तासांचे अथक प्रयत्नांनंतर बिबट्यास सुरक्षित रित्या पिंजऱ्यात जेरबंद केले.