रत्नागिरी ; महिला पोलिसाचा प्रसूती दरम्यान दुर्दैवी मृत्यू; बाळही दगावलं

0
418
बातम्या शेअर करा

रत्नागिरी- रत्नागिरी जिल्हा पोलीस दलात पोलीस हेडकॉन्स्टेबल असलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सांची सुदेश सावंत (38, रा. हेरिटेज सोसायटी, आरोग्य मंदिर,रत्नागिरी) असे आकस्मिक मृत्यू झालेल्या महिला पोलिस हेडकॉन्स्टेबलचे नाव आहे. प्रसूतीच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

सांची सावंत या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात महिला कक्षात हेडकॉन्स्टेबल या पदावर कार्यरत होत्या. त्या सध्या प्रसूतीच्या रजेवर होत्या. प्रसूतीसाठी त्यांना रत्नागिरी येथे एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र यावेळी त्यांना अचानक आकडी आल्याने त्या बेशुद्ध झाल्या. अधिक उपचारासाठी तातडीने दुसर्‍या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, यावेळी उपचार दरम्यान त्यांचा दुर्दैवीरीत्या मृत्यू झाला.

सांची सावंत यांचे पतीही रत्नागिरी पोलीस विभागातील डॉग स्कॉड पथकात पोलीस अंमलदार म्हणून कार्यरत आहेत. या दाम्पत्याला दोन मुली आहेत. सांची या तिसर्‍यावेळी गर्भवती असताना त्यांना प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी त्यांना आकडी येउन त्या बेशूध्द झाल्या. तेथील वैद्यकिय अधिकार्‍यांनी त्यांना शहरातीलच दुसर्‍या खासगी रुग्णालयात दाखल करण्यास सांगितल्यावर सांचीच्या पतीने त्यांना तात्काळ दुसर्‍या एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते, मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेत त्यांचे बाळही दगावले आहे

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील सावर्डे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हे कुटुंब आहे. या दुर्दैवी घटनेने सावंत कुटुंबियांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी त्यांचा मृतदेह नेण्यात आला होता. सांची यांच्या मृत्यूने रत्नागिरी पोलीस दलातूनही हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांचा मृत्यू झाल्याचं कळताच जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी शहर पोलीस ठाणे, ग्रामीण पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली. रत्नागिरी शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनीही जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल होत या घटनेची माहिती घेतली. रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून या घटनेची नोंद करण्यात आली आहे. सांची सावंत यांच्या पश्चात पती, दोन मुलं असा परिवार आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here