दापोली – प्रेमभंगातून नैराश्य आलेल्या उत्तर प्रदेशातील एका युवकाने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याची धक्कादायक घटना दापोलीत घडली. मात्र, या युवकाचे प्राण वाचवण्यात दापोली पोलिसांनी दाखवलेली तत्परता, दक्षता आणि माणुसकीचे भान समाजासाठी आदर्श ठरले आहे.
११ जुलैच्या सायंकाळी जंग बहादुर सिंग या युवकाने आपल्या फेसबुक अकाउंटवर “मी फास लावून आत्महत्या करणार आहे” अशी पोस्ट टाकली. ही पोस्ट काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखताच पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांच्या मार्गदर्शनाखाली दापोली पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली.
त्यानंतर दोन तास चाललेल्या या शोधमोहिमेत P.S.I. यादव, स्वप्नील शिवलकर, रुपेश दिंडे, उदय टेमकर, प्रविण क्षीरसागर आणि अविनाश कर्देकर हे पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते. स्थानिक नागरिक सचिन जाधव आणि उमेश पवार यांनीही शोधमोहीमेस मदत केली.
शेवटी काळकाई कोंड येथील बापू गायकवाड चाल परिसरातून जंग बहादुर सिंग याला सुखरूप शोधण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी त्याच्याशी समजूतदारपणे संवाद साधला आणि मानसिक आधार देत त्याला शांत केले. त्यानंतर त्याचे स्थानिक नातेवाईकांना बोलावून रात्रीच त्यांच्या सुपुर्द करण्यात आले.
विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रकरणात कोणताही गुन्हा नोंदवला गेला नाही. सहानुभूती, समजूतदारपणा आणि माणुसकीच्या दृष्टिकोनातून हा प्रकार हाताळण्यात आला. या घटनेमुळे दापोली पोलिसांनी दाखवलेली संवेदनशीलता आणि तत्परता समाजाच्या निदर्शनास आली असून, रत्नागिरी जिल्हाभरातून या पथकाच्या कार्याची प्रशंसा होत आहे. कायद्याच्या अंमलबजावणीसोबत माणुसकी जपणारे पोलिसांचे हे खरे रूप समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.