गुहागर – गुहागर गुरववाडी येथील मूर्ती कलाकार तसेच चित्रकार म्हणून परिचित असलेले संतोष परशुराम गुरव यांचा मृतदेह श्री लक्ष्मीनारायण मंदिराच्या तळ्यामध्ये आढळून आल्याने गुहागर परिसरात खळबळ उडाली आहे. त्यांच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, ही आत्महत्या आहे की दुर्दैवी अपघात, याचा तपास सुरू आहे.
संतोष गुरव हे गुरुवारी सायंकाळी कोणालाही न सांगता घराबाहेर गेले. ते परतले नाहीत म्हणून कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. सोशल मीडियावर त्यांचा फोटो प्रसारित करण्यात आला. काहींनी मोडका आगर व चिखली भागात त्यांना पाहिल्याचे सांगितले. मात्र शुक्रवारी सकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्यान श्री लक्ष्मीनारायण मंदिरात पूजेसाठी गेलेल्या गुरुजींना मंदिराच्या आवारात संतोष गुरव यांचे अंगावरील कपडे व सायकल आढळून आली. ही बाब पोलिसांना कळविण्यात आली. मात्र, त्यांचा कुठेही थांगपत्ता लागला नव्हता.शोधमोहीम दरम्यान दुपारी तळ्याच्या पाण्यावर मृतदेह तरंगताना दिसून आला. तो संतोष गुरव यांचाच असल्याचे ओळख पटली. गुहागरचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत, उपनिरीक्षक संदीप भोपळे, असगोली येथील पोलीस पाटील उदय असगोलकर, आरे येथील पोलीस पाटील मिलिंद सुर्वे यांच्यासह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अधिक तपास गुहागर पोलीस करत आहेत.