रत्नागिरी – रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे ‘मिशन प्रगती’ आणि ‘मिशन प्रतिसाद’ हे दोन उपक्रम राबवण्यात येत असून, नागरिकांशी थेट संपर्कासाठी सर्व पोलीस ठाण्यांना नवीन मोबाईल क्रमांक देण्यात आले आहेत. या उपक्रमांची माहिती पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
‘मिशन प्रगती’ अंतर्गत गुन्ह्याच्या तपासात झालेली प्रगती थेट फिर्यादीला मोबाईल मेसेजद्वारे कळवण्यात येणार आहे. त्यामुळे पोलिसांकडून वेळोवेळी तपासाबाबत अपडेट मिळणार असून, नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ होईल. या उपक्रमामुळे तपास प्रक्रियेत पारदर्शकता येईल, असेही बगाटे यांनी स्पष्ट केले. दुसऱ्या बाजूला, ‘मिशन प्रतिसाद’ हा उपक्रम जेष्ठ नागरिकांच्या सहाय्यासाठी सुरू करण्यात आला आहे. त्यांच्या तक्रारी, अडचणी, किंवा मदतीची गरज असल्यास, 9684708316 या विशेष मोबाईल क्रमांकावर संपर्क करता येणार आहे. यासोबतच ‘प्रतीसाद हेल्पलाइन’साठी स्वतंत्र क्रमांक 8390929100 देखील कार्यान्वित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यासाठी स्वतंत्र मोबाईल नंबर निश्चित करण्यात आले आहेत. हे सर्व नंबर ‘सिमकार्ड बेस लँडलाइन’ स्वरूपात कार्यरत असून, नागरिक थेट संबंधित पोलीस ठाण्याशी संपर्क साधू शकतील. तपास, तक्रारी, किंवा अन्य पोलिसी कामकाजासाठी या क्रमांकांचा उपयोग केला जाऊ शकतो. पोलीस हे केवळ कायदा-सुव्यवस्थेची यंत्रणा नसून समाजाच्या कल्याणासाठी कार्यरत असलेली बांधील संस्था आहे, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न या दोन्ही उपक्रमांद्वारे करण्यात येत आहे, असे सांगत अधीक्षक बगाटे यांनी पुढील काळात आणखी नागरिकाभिमुख उपक्रम राबवण्याचा निर्धार व्यक्त केला.