गुहागर – गुहागर तालुक्यातील विसापूर येथील साग वृक्षांच्या बेकायदेशीर तोडीवर गुहागर वनविभागाने धडक कारवाई केली. या कारवाईत एकूण 4.231 घनमीटर साग लाकडाचे 85 नग घटनास्थळीच जप्त करण्यात आले.
अजिजा मणियार यांच्या मालकीच्या जमिनीतून 6 वृक्ष तोडून 25 नग, तर सईद मणियार यांच्या जागेतील 9 वृक्षांपासून 60 नग लाकूड तयार करण्यात आले होते. या संपूर्ण प्रकरणात चिपळूण येथील समीर युनूस सय्यद याने ही बेकायदेशीर तोड केल्याचा आरोप असून, त्याच्याविरुद्ध वनविभाग दंडात्मक कारवाई करणार आहे, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे.
वनविभागाच्या या तत्पर कारवाईमुळे या परिसरात खळबळ उडाली असून, अशा अनधिकृत वृक्षतोडींना आळा बसण्याची शक्यता आहे. नागरिकांतून या कारवाईचे स्वागत होत आहे.















