गुहागर – गुहागर पोलिसांनी दमदार कामगिरी करत, कोतळूक येथील हनुमान मंदिरातील चोरीचा अवघ्या ४ तासांत छडा लावला आहे. या कारवाईत पोलिसांनी चोरलेला १००% मुद्देमाल हस्तगत केला असून, एका आरोपीलाही ताब्यात घेतले आहे.
2 जून रोजी मध्यरात्री गुहागर तालुक्यातील कोतळूक येथील हनुमान मंदिराच्या गाभाऱ्याचा दरवाजा अज्ञात इसमाने कडी-कोयंडा उचकटून उघडला. गाभाऱ्यात प्रवेश करून तेथे ठेवलेली लाकडी दानपेटी चोरून नेल्याची माहिती गुहागर पोलिसांना मिळाली. या घटनेप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ४०/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम ३३१ (३), ३३१ (४), ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांनी तात्काळ एक पथक नेमले. गोपनीय माहिती आणि मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवून त्याचा शोध घेण्यात आला. घटना घडल्यापासून अवघ्या ४ तासांतच सौरभ संतोष कदम, या आरोपीस ताब्यात घेण्यात आले.
आरोपीच्या अटकेबाबत पुढील कार्यवाही सुरू असून, त्याने चोरून नेलेला १००% मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अवघ्या ४ तासांत हा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपीने यापूर्वी अशाच प्रकारच्या मंदिर चोऱ्या आणि घरफोडीचे गुन्हे केले आहेत का, याबाबत अधिक तपास सुरू आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस निरीक्षक सचिन सावंत, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुजीत सोनावणे, स्वामिनी नाटेकर, वैभव चौगले, प्रितेश रहाटे ,प्रतिक रहाटे, प्रथमेश कदम, निखील पाटील आणि सिमा मोरे यांनी पार पाडली.
 
             
		
