पुणे – पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याला येथे फिरण्यासाठी गेलेल्या गुहागरमधील एका तरुणाचा, केवळ गाडी वळवण्याच्या कारणावरून स्थानिक लोकांशी झालेल्या वादातून खून झाल्याची धक्कादायक घटना रविवारी, २५ मे रोजी रात्री उशिरा घडली. या घटनेत दोन जण जखमी झाले असून, पोलिसांनी दोघांना अटक केली असून अन्य सात जण फरार आहेत. या घटनेमुळे गुहागर परिसरात खळबळ उडाली आहे.
कमलेश तानाजी धोपावकर हा तरुण आपल्या मित्रांसोबत लोणावळ्यातील एकवीरा देवीचे दर्शन घेण्यासाठी गेला होते. दर्शनानंतर एका फार्महाऊसजवळ गाडी वळवत असताना स्थानिक तरुणांच्या टोळक्याशी त्यांचा वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि याच झटापटीत कमलेश धोपावकर यांच्यावर प्राणघातक हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आली. ही घटना घडताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दोन स्थानिक तरुणांना अटक करण्यात आली असून, इतर सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपींचा शोध युद्धपातळीवर सुरू असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.या घटनेमुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सार्वजनिक ठिकाणी किरकोळ कारणांवरून होणाऱ्या हिंसक घटनांमुळे पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होत असल्याने याकडे संबंधित प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
कमलेश तानाजी धोपावकर हा आपल्या अडुर या गावी मच्छीमार नवखेवर खलाशी म्हणून काम करत असे सध्या मच्छीमारी बंद झाल्याने आपल्या काही मित्रांसह तो फिरण्यास गेला होता. त्यावेळी हा प्रसंग घडल्याने सर्वत्र संताप आणि नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. त्याच्या कुटुंबाला न्याय मिळावा अशी मागणी अडून येथील ग्रामस्थ करत आहेत.
















