गुहागर – ( संदेश कदम) – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका लक्षात घेऊन भाजपा प्रदेश कमिटीने राज्यातील सर्वच तालुका अध्यक्ष पदाची निवडणूक जाहिर केली आहे आज रविवार दिनांक २० एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ४:३० वाजता शृंगारतळी येथील भाजपा संपर्क कार्यालयात नुतन तालुकाध्यक्ष पदाची निवड केली जाणार आहे या पदासाठी तिघांची नावे चर्चेत असून विद्यमान तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांना पुन्हा संधी दिली जाते की, त्यांना जिल्हा कार्यकारिणी मध्ये महत्त्वाचे पद दिले जाते याकडे सर्व कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रशांत शिरगावकर, पक्ष निरिक्षक निलम गोंधळी, जिल्हाध्यक्ष केदार साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड केली जाणार आहे. भाजपा तालुकाध्यक्ष पदासाठी तिघांची नावे चर्चेत असून सचिन मुकुंद ओक हे गुहागर भाजपा तालुका सरचिटणीस पदी गेले दोन टर्म, ३ वर्ष युवा मोर्चा तालुकाध्यक्ष तसेच गेली १५ वर्षे कोतळूक ग्रामपंचायत सदस्य म्हणून उत्तम काम पाहिले आहे. मंगेश गणपत रांगळे हे भाजपा तालुका उपाध्यक्ष आणि सामाजिक कार्यात अग्रेसर म्हणून त्यांची ओळख आहे. तर अभय अशोक भाटकर हे हेदवी गावचे सुपुत्र असून जिल्हा उपाध्यक्ष, संघ ते भाजपा असा त्यांच्या कार्याचा ठसा आहे. जर कुणबी समाजाला प्रतिनिधित्व द्यायचे झाल्यास मंगेश रांगळे यांची निवड केली जाऊ शकते. दरम्यान विद्यमान तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांनाही बढती देण्याची दाट शक्यता आहे. भाजपा जिल्ह्यातील आक्रमक तालुकाध्यक्ष म्हणून निलेश सुर्वे यांच्याकडे पाहिले जाते. भाजपाच्या घटनेमध्ये सलग तालुकाध्यक्ष ठेवता येत नसल्याने व सलग दोन टर्म निलेश सुर्वे यांना संधी देण्यात आल्याने त्यांना जिल्ह्यात काम करण्याची संधी दिली जाऊ शकते.