गुहागर – माझा सत्कार करताना प्रमोद गांधी यांनी माझ्यावर छत्री धरली. कोण कुणाच्या छत्राखाली गेले याला महत्व नाही, त्यांनी छत्री धरल्याने मीच त्यांच्या छत्रीखाली गेलो, त्यामुळे कितीही वादळ-वारे आले तरी मला आता कसलीही चिंता नाही. अशा विनोदी शैलीत आ. भास्कर जाधव यांनी राजकीय फलंदाजी केली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर विधानसभा मतदारसंघ आयोजित एक समाज एक संघ क्रिकेट स्पर्धा शृंगारतळी येथे जानवळे फाटासमोरील मैदानात गेले दोन दिवस सुरु आहेत. दुसऱ्या दिवशी आ. जाधव यांनी या स्पर्धेला भेट देऊन मनसे संपर्क अध्यक्ष व स्पर्धा आयोजक प्रमोद गांधी व सर्व समाजातील खेळाडूंना
शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, अशा भव्य दिव्य स्पर्धा सर्व समाजाला संघटीत करुन व त्यांना एकाच छताखाली आणून राबविल्याबद्दल प्रमोद गांधी यांचे मी कौतुक करतो. गुहागर तालुक्यात खेळासाठी मैदान नाहीत. अशावेळी या मैदानाची जमीन संबंधित मालकांनी दिल्यास आपण येथे भव्य दिव्य असे स्टेडियम बनवू शकतो, असेही आ. जाधव यांनी मत व्यक्त करुन त्या स्टेडियमला यांचे नावही देऊ असे यावेळी जाहीर केले. यावेळी व्यासपीठावर पाटपन्हाळे सरपंच विजय तेलगडे, उपसरपंच आसीम साल्हे, मनसे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, सुनील पवार, भगवान कदम, सुरेश सावंत आदी उपस्थित होते. यावेळी गांधी यांनी आ. जाधव यांचा सन्मान केला.