गुहागर- गुहागर येथील खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा महाविद्यालयातील प्रथम वर्षाचा प्रवेश, त्यांची हजेरी, त्यांच्या परीक्षा हे सर्व काही बोगस दाखवून त्यांना मुंबई विद्यापीठाकडून थेट तिसऱ्या वर्षाचे पदवी प्रमाणपत्र दिले जात असल्याचे आणि यातून करोडो रूपयांचा गैरव्यवहार सुरू असल्याची पोलखोल गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभेत केली आहे. त्यामुळे संपूर्ण कोकणातील शैक्षणिक क्षेत्रात याचे पडसाद उमटू लागले आहेत.
विधानसभेत याविषयी माहिती देताना आ. जाधव यांनी थेट आपल्या मतदारसंघातील एका नामांकीत शिक्षण संस्थेच्या प्रशासनावर गंभीर आरोप केला आहे. माहिती देताना ते म्हणाले, कोकणात दरवर्षी इयत्ता १० वी, १२ वी परिक्षांचे निकाल चांगल्या प्रकारे लागतात. महाराष्ट्रात दरवर्षी कोकण विभाग अव्वल असतो. येथील मुलांची गुणवत्ता चांगली आहे. मात्र, कोकणवगळता इतर काही भागातील शर्मा, वर्मा नावाचे लोक गुहागरसारख्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतात आणि तासिकांना, परीक्षांना न बसता थेट उर्तीर्ण पदवीचे प्रमाणपत्र मिळवतात. अशा खोट्या पदव्या मिळविणारी प्रकरणे आजपर्यंत कोकणात समोर आलेली नाहीत. त्यामुळे गुहागर महाविद्यालयातील प्रकाराने संपूर्ण शिक्षण क्षेत्राला बट्टा लागला आहे.
या बोगस पदवी प्रमाणपत्र प्रकरणाचा पुरावा देताना आ. जाधव यांनी गुहागर खरे-ढेरे महाविद्यालयात डिसेंबर, २०२४ च्या दरम्यान घडलेल्या प्राध्यापक मारहाण प्रकरणाचा मुद्दा सभागृहाला निदर्शनास आणून दिला. या महाविद्यालयात चालणाऱ्या अशाप्रकारच्या बेकायदेशीर व नियमबाहय कामे करण्यास नकार दिला म्हणून दिनांक १८ डिसेंबर, २०२४ रोजी संस्था चालकांनी ३ प्राध्यापकांना मारहाण करणे, त्यामध्ये तिघेही गंभीर जखमी होणे असा प्रकार घडला. कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार करून सदर महाविद्यालयातून आतापर्यंत शेकडो विद्यार्थ्यांना अशाप्रकारे थेट पदवी प्रमाणपत्र देण्यात आल्याची बाब या प्राध्यापक मारहाणप्रकरणाने समोर आलेली आहे.
सदर प्रकार उघडकीस आल्यानंतर संस्था चालकांना वाचविण्याचे धक्कादायक प्रयत्न सुरु झाले होते. मारहाण करणाऱ्या संस्थाचालकांविरोधात गुन्हा दाखल करावा म्हणून जखमी प्राध्यापक गुहागर पोलीस ठाण्यात गेले मात्र, तेथील पोलिसांवर राजकीय दबावापोटी त्यांना तासनतास पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले व गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करण्यात आली. एकूणच या महाविद्यालयातील संपूर्ण प्रकाराबाबत व या घोटाळ्यामध्ये मुंबई विद्यापीठाच्या काही अधिकारी व कर्मचारी यांचाही सहभाग असण्याची शक्यता असून या प्रकरणाचा उलगडा करुन दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी आ. भास्कर जाधव यांनी केली.