चिपळूण – मध्यरात्री सुमारे १२.३० ची वेळ होती. काळाकुट्ट अंधार पसरलेला… परिसरात भयान शांतता… अचानक घराबाहेर मोठ-मोठ्याने कुत्री भुंकू लागली…. या आवाजाने झोपेतून जागे झालेल्या आशिष महाजन यांनी हातात बॅटरी, कामेरू घेत घराचा मागील दरवाजा उघडला आणि मग जे समोर घडलं तो प्रसंग पाहून त्यांच्यासह त्यांच्या पत्नीच्याही पायाखालची वाळू सरकली. समोर असलेल्या बिबट्याने महाजन यांच्यावर झडप घालत जोरदार हल्ला चढविला…. या हल्ल्यात आशिष महाजन रक्तबंबाळ झाले….मात्र तरीही, त्याच धाडसाने त्यांनी आपला बचावात्मक पवित्रा सुरूच ठेवला. पती व बिबट्यामधली झटापट पाहून पत्नीनेही मदतीसाठी टोहो फोडला, अखेर शरीरातील सर्व बळ एकटवत महाजन यांच्या पत्नीने बिबट्यावर प्रतिहल्ला केला आणि सुदैवाने त्यात यश आले…. या झटापटीत बिबट्याही गंभीर जखमी झाला आणि काही वेळातच त्याने प्राण सोडले…
चिपळूण तालुक्यातील तोंडली-वारेली गावाच्या सीमेवर शनिवारी मध्यरात्री घडलेल्या या थरारक घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. चिपळूण तालुक्यातील तोंडली वारेली गावाच्या सीमेवर आशिष शरद महाजन यांचे घर आहे. पुणे येथून ते या ठिकाणी स्थायिक झाले आहेत. ते व त्यांची पत्नी येथे वास्तव्याला आहेत. त्यांना शेतीची विशेष आवड असून ते प्रगतशील शेतकरी आहेत. लोकवस्तीपासून काही अंतरावर त्यांचे घर आहे. तर आजूबाजूला जंगलमय भाग आहे. शनिवारी रात्री जेवण आटोपल्यानंतर ते नेहमीप्रमाणे झोपी गेले. गावच्या सीमेवर एकच घर आणि आजूबाजूला जंगल असल्याने ते नेहमीच स्वतःच्या संरक्षणासाठी बॅटरी, काठी, सर्प मारण्याचे कामेरू यांसारखे साहित्य आपल्या जवळ ठेवतात. त्या रात्री देखिल असे साहित्य त्यांच्या जवळ होते. रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास आशिष महाजन यांच्या घराजवळ कुत्री भुंकायला लागली. कुत्र्यांचा आवाज भयंकर वाढला. या आवाजाने महाजन व त्यांच्या पत्नी दोघेही जागे झाले. तेवढ्यात महाजन हे हातात बॅटरी व दुसऱ्या हातात कामेरू घेऊन मागील दरवाजाकडे गेले, तर त्यांच्या पत्नीने समोरच्या खिडकीतून डोकावताच त्यांना समोर बिबट्या दिसला. त्यांनी आपल्या पतीला आवाज दिला. मात्र तोवर महाजन हे मागील दरवाजा उघडून बाहेर पडले. याचवेळी समोरून बिबट्याने थेट त्यांच्यावर हल्ला चढवला. आशिष महाजन यांनी त्या हल्ल्यातून वाचण्यासाठी हातातील कामेरूने बिबट्याला प्रतिकार करण्यास सुरुवात केली. बिबट्या एकामागून एक जोरदार हल्ले चढवत होता, तर स्वतःला वाचवण्यासाठी व बिबट्याच्या तावडीतून सुटका करून घेण्यासाठी आशिष महाजन देखिल जोरदार झटापट करत होते. एकबाजूने प्रहार तर दुसऱ्या बाजूने प्रतिकार असा थरार तब्बल काही मिनिटे सुरूच होता. याचवेळी आशिष महाजन आणि त्यांच्या पत्नीनेही आरडा ओरडा केली. महाजन यांच्या पत्नीने आरडाओरड केल्याने काही ग्रामस्थांनीही तेथे धाव घेतली. मात्र बिबट्या मागे हटण्यास तयार नव्हता. बिबट्याने महाजन यांचे पाय, हात, छाती आणि चेहऱ्यावर देखिल जबरदस्त असे प्रहार केल्याने आशिष महाजन गंभीर जखमी झाले. अक्षरशः रक्तबंबाळ झाले. अशाही परिस्थितीत त्यांनी धैर्याने प्रतिकार केला. शेवटपर्यंत त्यांनी अतिशय कडवी झुंज दिली. महाजन यांच्याही पत्नीने धाव घेत पतीला बिबट्याच्या तावडीतून सुटका करून घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. या झटापटीत बिबट्या देखिल जखमी झाला. थकला, हडबडला, भुकेने व्याकुळ झाला आणि अखेर जमिनीवर पडला. त्याच्यात जणू त्राण नव्हते. काही वेळेतच त्याने प्राण सोडले.
जखमी आशिष महाजन यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण पाहणी केली ‘व पंचनामा करून मृत बिबट्याला ताब्यात घेतले. अधिकाऱ्यांनी यावेळी ग्रामस्थांशी देखिल संवाद साधला व सावध राहण्याचे तसेच परिसरात बिबट्या दिसला तर तात्काळ वन विभागाकडे संपर्क साधण्याचे आवाहन केले.
अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष संदीप सावंत यांना माहिती मिळताच त्यांनी कार्यकर्त्यांची एक टीम घटनास्थळी पाठवली. तसेच वन विभागाला घटनेची माहिती दिली. या हल्ल्यात आशिष महाजन गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.