चिपळूण – चिपळूणमधील पुलावरील गर्डर कोसळल्याप्रकरणी संबंधित ठेकेदाराला ५० लाखांचा दंड केला आहे. आराखडा बनवणाऱ्या अभियंत्याला २० लाखांचा दंडही केला आहे. जानेवारी २०२६ अखेर हा पूल पूर्ण होईल. महामार्गाच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. क्वालिटी कंट्रोल विभागाकडून याची चौकशी केली जाणार आहे, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अधिवेशनात दिले.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाबाबत आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडली. त्याला उत्तर देताना मंत्री भोसले यांनी सांगितले की, महामार्गाच्या कामाला २०११ पासून सुरुवात झाली. मी स्वतः या मार्गाची पाहणी केली; परंतु महामार्गातील पनवेल, इंदापूर ते पात्रादेवी या ३६० किलोमीटरमध्ये काही टप्पे रखडले आहेत. नवीन एजन्सी नेमली आहे. ११ महिन्यांची मुदत इंदापूर आणि माणगाव बायपासला दिली आहे. संगमेश्वर टप्पा मागे पडला आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्व्हिस रोड, परशुराम घाटातही ठेकेदाराकडून नवीन आराखडा करून काम केले जाईल, असे त्यांनी सांगितले.