चिपळूण – चिपळूण तालुक्यातील आदर्श गाव म्हणून ओळख असलेले कळवंडे गाव सध्या कोळसा भट्ट्यांचे केंद्र बनत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कळवंडे गावात धगधगत असलेल्या तब्बल १२ कोळसा भट्ट्या दोन दिवसांत वन विभागाने उध्वस्त करीत भट्टीसाठी ठेवेलेले १८ घनमीटर लाकूड जप्त केले आहे. याप्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या भट्ट्या कोणी लावल्या याचा शोध अधिकाऱ्यांमार्फत घेतला जात आहे.
कोकणात कोळसा भट्ट्या लावण्यास न्यायालयाने बंदी घातलेली आहे. असे असतानाही गेली अनेक वर्षे शहराजवळच्या टेरव येथील जंगलात कोळसा भट्ट्या धगधगत होत्या. यावर्षी वन विभागाने या कोळसा भट्ट्या उध्वस्त केल्या व सातत्याने कारवाईचे सत्र सुरू ठेवले आहे. तर ज्या गावात झाडेतोड बंदी आहे, गुरे मोकाट सोडण्यास बंदी घालण्यात आली आहे अशा कळवंडे या आदर्श गावात वन विभागाला कोळसा भट्ट्या आढळून आल्या आहेत. नुकत्याच केलेल्या कारवाईत वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी धगधगत असलेल्या आठ कोळसा भट्ट्या उध्वस्त केल्या व त्यातील सहा घ. मी. लाकूड जप्त करण्यात आले. ही कारवाई ताजी असतानाच वन विभागाला मिळालेल्या माहितीनुसार पुन्हा सकाळी कळवंडे येथे माडवाडी येथील जंगलात लाकडे रचून ठेवलेल्या चार भट्ट्या आढळून आल्या. त्या भट्ट्या उध्वस्त करून १२ घनमीटर लाकूड वन विभागाने जप्त केले आहे. यामुळे आता बेकायदेशिरपणे कोळसा भट्ट्या लावणारे वन विभागाच्या कारवाईवर लक्ष ठेवून असून आपले बस्तान वेगवेगळ्या ठिकाणी मांडत आहेत. त्यामुळे आगामी काळात वन विभागासमोर आव्हान असणार आहे. कळवंडे येथील पोलीस पाटील अनंत उदेग यांनी वन विभागाला या बाबत माहिती कळविली. यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. त्यामुळे आता कोळसा भट्ट्या चालविणाऱ्यांचे धाबे आता चांगलेच दणाणले आहेत.