गुहागर मतदारसंघातही उबाठा गटाला धक्का ; या माजी तालुकाप्रमुखने सहकाऱ्यांसह केला शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश

0
829
बातम्या शेअर करा

चिपळूण- गुहागर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे माजी तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी आपल्या सहकाऱ्यांसह अचानकपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्याने गुहागर मतदारसंघात उबाठाला जोरदार धक्का बसला आहे.पक्ष फुटीच्या दृष्टिकोनातुन आतापर्यंत एकसंघ असलेल्या गुहागर मतदारसंघात उबाठाला हा पहिला धक्का बसला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात ऑपरेशन टायगर ची सद्या जोरदार हवा आहे.शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे माजी आमदार,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, माजी जिल्हाप्रमुख, माजी सभापती असे अनेक महत्वाचे पदाधिकारी थेट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल होत आहेत.त्यामुळे राजापूर पासून मंडणगड पर्यंत उबाठा ला मोठी गळती लागल्याचे दिसून येत असून ठाकरे पक्षाचे अस्तित्वच संपुष्टात येते की काय अशी स्पष्ट चिन्हे दिसू लागली आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रत्नागिरी येथे झालेल्या मोठ्या पक्षप्रवेशाने रत्नागिरी जिल्ह्यात ऑपरेशन टायगर यशस्वी होत असल्याचे स्पष्टपणे समोर आले आहे.

विशेष म्हणजे शिवसेनेत फूट पडल्यानंतर प्रत्येक तालुक्यात त्याचे पडसाद उमटले परंतु गुहागर विधानसभा मतदारसंघ त्याला अपवाद ठरला होता.येथील उबाठा अखंडीत एकसंघ होती.परंतु आता येथे देखील बुरुज ढासळू लागला आहे.गुहागर मतदारसंघातील उबाठाचे माजी तालुकाप्रमुख म्हणून ओळख असलेले अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष संदीप सावंत यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करून खळबळ उडवून दिली आहे.त्यांचा अचानक झालेला पक्षप्रवेश राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे.
प्रत्यक्षात संदीप सावंत हे माजी खासदार विनायक राऊत यांचे अत्यंत जवळचे विश्वासू मानले जात होते.तसेच माजी मंत्री अनंत गीते यांच्यासाठी त्यांनी गुहागर मतदारसंघात मोठा संघर्ष करून काम केले होते.मात्र विद्यमान आमदार शिवसेना नेते भास्करराव जाधव यांच्या बरोबर संदीप सावंत यांचे मतभेद झाले.संदीप सावंत यांनी आम.जाधव यांच्या विरोधात जोरदार टीकाटिप्पणी करत आघाडी उघडली होती.पक्षात ते प्रचंड नाराज होते.परंतु पक्ष सोडण्याचे कोणतेच संकेत त्यांच्याकडून मिळत नव्हते.
परंतु अचानकपणे त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या.विनायक राऊत व अनंत गीते यांचे कट्टर समर्थक असलेल्या संदीप सावंत यांचा हा पक्षप्रवेश सहाजिकच चर्चेचा विषय बनला आहे.पालकमंत्री उदय सामंत तसेच माजी आमदार सुभाष बने यांनी संदीप सावंत यांना पक्षप्रवेशासाठी प्रयत्न केले होते अशीही चर्चा आहे.मात्र संदीप सावंत यांच्या शिवसेना पक्षप्रवेशाने गुहागर मतदारसंघात उबाठा ला जोरदार धक्का बसला आहे.तसेच आमदार भास्कर जाधव यांचे बंधू बाळकृष्ण जाधव यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला.त्यामुळे या भागात उबाठाचे मोठे नुकसान झाल्याचे चित्र आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here