रायपूर – पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील पारितोषिकांचे वितरण लोकसभेचे माजी सदस्य डॉ. नंदकुमार साय व छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांच्या हस्ते झाले. यामध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या (महापारेषण) जनसंपर्क विभागाला सर्वोत्कृष्ट सोशल मीडिया अँड पीआर, ब्रॅंडिंग व भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी राष्ट्रीय जागृती अभियान हा विशेष पुरस्कार मिळाला. महापारेषणचे जनसंपर्क अधिकारी डॉ. मिलिंद आवताडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
या पारितोषिकांबद्दल महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार (भा.प्र.से.) यांनी जनसंपर्क विभागाचे अभिनंदन केले. छत्तीसगडमधील रायपूरच्या हॉटेल बेबीलॉन इंटरनॅशनलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 47 व्या भारतीय जनसंपर्क परिषदेच्या समारंभात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी पीआरएसआयचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अजित पाठक, सचिव डॉ. पीएलके मूर्ती, डॉ. यू. एस. शर्मा, डॉ. समीर गोस्वामी, रायपूर चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. शाहीद अली यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
 
             
		
