चिपळूण नगरपालिकेतील त्या कंत्राटी अभियंत्याला अखेर “डच्चू” जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई

0
323
बातम्या शेअर करा

चिपळूण – चिपळूण येथील नगरपालिकेत कंत्राटी अभियंता म्हणून कार्यरत असलेले आशिष सुर्वे यांना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी अखेर ‘डच्चू’ मिळाला आहे. माजी नगरसेवक इनायत मुकादम यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे यासंदर्भात तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने केलेल्या चौकशीनंतर नगर पालिकेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी हा कारवाईचा बडगा उगारला आहे.

चिपळूण नगर पालिकेतील बांधकाम विभागात आशिष सुर्वे हे कंत्राटी अभियंता म्हणून कार्यरत होते. ठेका बदलला तरीही १० ते १२ वर्षे त्यांची येथे नियुक्ती होत होती. यामुळे त्यांचे अनेक व्यावसायिक ठेकेदारांबरोबर हितसंबध वाढले होते. या संबंधामुळे आपल्या मर्जीतील ठेकेदारांच्या कामावर निरीक्षण व देखरेख करताना कामाचा दर्जा व उणिवांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात होते. यातून नगरपालिकेचे लाखों रूपयांचे आर्थिक नुकसान हेत असल्याची तक्रार दि. २७ मे २०२४ रोजी माजी नगरसेवक इनायत मुकादम यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. यांच्या काम करण्याच्या पध्दतीवर आक्षेप घेत त्यांना येथून हटविण्याची मागणीची जिल्हाधिकाऱ्यांनीही गंभीर दखल घेतली. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने याची चौकशी करण्याच्या सूचना मुख्याधिकारी विशाल भोसले यांना दिल्या होत्या. त्यानुसार त्यांनी याची चौकशी केल्यानंतर आशिष सुर्वे यांचे काम थांबवण्यात आले आहे. मुख्याधिकारी यांनी सह्याद्री बेरोजगार अभियंता सहकारी संस्था मर्यादित सावर्डे यांना लेखी पत्र देत ही कारवाई केली.

खाजगी सेवा तत्त्वावरील अभियंता नियुक्तीतील काही चुका मी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. या प्रकरणाची योग्य पध्दतीने चौकशी करून मुख्याधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईतून अन्य कर्मचारी नक्कीच धडा घेतील. याबद्दल मी जिल्हाधिकाऱ्यांचा आभारी आहे.

इनायत मुकादम,
माजी नगरसेवक, चिपळूण


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here