गुहागर – राज्यभरात विधानसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहत असताना आता गुहागर मधील राजकारणात मात्र एक नवीनच राजकीय खेळी करत शिवसेना शिंदे गटाने गुहागरचे नगराध्यक्ष राजेश बेंडल यांचा आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश करून या मतदारसंघातील आगामी निवडणुकीत हा आपला उमेदवार असल्याचा एक इशारा दिला आहे.
मुंबई येथे झालेल्या एका कार्यक्रमात गुहागरचे नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी आपल्या सहकार्यासह आमदार उदय सामंत यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला त्यामुळे गुहागर मधून महायुतीकडून एकनाथ शिंदे यांची शिवसेना लढणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून राजेश बेंडल हे कुणबी समाजाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवू शकता. कारण या मतदारसंघात कुणबी समाजाने निवडणूक लढवावी अशी मागणी सर्वच पक्षाकडून केली जात आहे. राजेश बेंडल यांच्या या प्रवेशाने या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना होईल. आणि त्यात गुहागर विधानसभा मतदारसंघात कुणबी समाजाची जी एक गट्टा मतदान आहे. ते ज्या उमेदवाराला होईल तो उमेदवार विजयी होईल अशी चर्चा या मतदारसंघात रंगू लागली आहे. त्यामुळे भास्कर जाधव यांच्या विरोधात गेले काही दिवस महायुतीचा उमेदवार कोण.? असा जो प्रश्न उभा राहिला होता. तो प्रश्न आता या निमित्ताने सुटला आहे.