गुहागर – मेडिकल कॉलेजला ऍडमिशन देतो असे सांगून गुहागर मधील एका तरुणाची 13 लाखांला फसवल्याची घटना घडली आहे. याबाबत किरण संपतराव सन्मुख यांनी आपली फसवणुक झाल्याची फिर्याद दाखल केली आहे.
आपण मेडिकल ऍडमिशन कौन्सीलर असल्याचे भासवून एमबीबीएसला आपल्या मुलाचे ऍडमिशन करून देतो असे खोटे सांगत गुहागर तालुक्यातील चिखली येथील किरण संपतराव सन्मुख या व्यक्तीला तब्बल 13 लाखाला गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी गुहागर पोलिस ठाण्यामध्ये तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. 1 सप्टेंबर 2024 ते 6 ऑक्टोबर 2024 या कालावधीत ही फसवणुक केली आहे. दाखल केलेल्या या फसवणुकीच्या तक्रारीवरून हिमांशी मिश्रा, जयंत मिश्रा आणि उमंग मिश्रा यांनी फोन करून त्यांच्या कुटुंबियांना वारंवार संपर्क करून ते मेडिकल ऍडमिशन कौन्सीलर असल्याचे भासवून त्यांनी यांचा मुलगा रामकृष्ण यास एमबीबीएस ला ऍडमिशन करून देतो असे खोटे आश्वासन देवून
त्याद्वारे फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून संगणकीय माध्यमाद्वारे फिर्यादी याचा मुलगा रामकृष्ण याच्या जीमेल आयडीवर ऍडमिशन घेण्यासाठी बनावट लिंक पाठवून त्यावर फिर्यादी व त्यांचे कुटुंबियांची माहिती टाकण्यास भाग पाडले. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक स्वरूपात बनावट अलाईनमेंट लेटर पाठवून ऍडमिशन प्रक्रियेवर पैशाची मागणी करून रूपये 13 लाख एनइएफटी द्वारे ट्रान्सफर करावयास लावून फिर्यादी यांची फसवणुक केली आहे.
याप्रकरणी गुहागर पोलिस ठाण्यामध्ये हिमांशु मिश्रा, जयंत मिश्रा व उमंग मिश्रा या अनोळखी पत्ता माहित नसलेल्या व्यक्तींवर भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 316(2), 318(4), 336(3), 340(2), 3(5), माहीती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66 (ड) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास गुहागरचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत हे करत आहेत.