गुहागर – गुहागर विधानसभा मतदारसंघात आगामी निवडणुकीत महायुतीतर्फे शिवसेना शिंदे गटाचे विपुल कदम हे इच्छुक असल्याने त्यांची चाचपणी सध्या गुहागर मतदारसंघात केली जात आहे. त्यातच शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण गेल्या आठ दिवसापासून गुहागर विधानसभा मतदारसंघातील अनेक भागात दौरे करत उमेदवारीबद्दल चाचपणी करत आहेत. आज त्यांनी चिपळूण तालुक्यातील 72 गावातील कार्यकर्त्यांची एक बैठक नुकतीच रामपूर येथे घेतली.
शिवसेना शिंदे गटाचे इच्छुक उमेदवार विपुल कदम यांनी गुहागर मध्ये शृंगारतळी येथे शिवसेना शाखेचे उद्घाटन करून तालुक्यातील अनेक जुन्या जाणत्या शिवसैनिकांच्या भेटी घेतल्या त्यानंतर आता स्वतः जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण हे गुहागर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत असल्याने शिवसेनेच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य उसळले आहे.
आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाची स्थिती गुहागर विधानसभा मतदारसंघात नक्की काय आहे.? सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या नक्की मनात काय आहे.? याची चाचपणी करण्यासाठी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण हे सक्रिय झाले आहेत. चिपळूण तालुक्यातील 72 गावातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर उद्या दिनांक 8 रोजी खेड तालुक्यातील लोटे येथे पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी आणि बैठकी होणार आहेत. त्यानंतर गुहागर तालुक्यातील पदाधिकारी व सर्वसामान्य शिवसैनिकांच्या भेटीगाठी दिनांक 10 रोजी शशिकांत चव्हाण जिल्हाप्रमुख घेणार असल्याने पुन्हा एकदा या मतदारसंघावर शिवसेना दावा करणार या चर्चेला जोर धरू लागला आहे.
आगामी विधानसभेत महायुती तर्फे भारतीय जनता पार्टीचे डॉक्टर विनय नातू यांनी प्रचाराला सुरुवात केली होती. त्यातच आता शिवसेना शिंदे गटाचे विपुल कदम यांनी दावेदारी केली असून त्यांच्या या दावेदारी निमित्त शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण हे सक्रिय झाल्याने आता हा मतदारसंघ महायुतीमधून नक्की कोण लढवणार ? याची चर्चा नाक्या नाक्यावर सुरू आहे.