चिपळूण – नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट,आणि शिवसेना ठाकरे गट, या तीन पक्षांसह समविचारी पक्षांच्या महाविकास आघाडीने चांगल्या पद्धतीने काम केले. आता येत्या विधानसभा निवडणुकीतही मित्रपक्षांनी आघाडी धर्म पाळला जात असताना कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, जिल्हात काॅग्रेस पक्षाला विधानसभेच्या एकुण १२जागा मिळाव्यात नाहीतर सांगली पॅटर्न राबविण्यात येईल असे सुनिल सावर्डेकर उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती कमिटी व प्रभारी कोकण विभाग यांनी विधान केले आहे
ज्या हुकूमशाही पद्धतीने राज्यकर्त्यांचे काम चालू आहे, ते मोडण्याचे काम महाविकास आघाडीतील कार्यकर्ते, नेत्यांनी केल्याने त्याचा फायदा लोकसभा निवडणुकीत आघाडीच्या उमेदवारांना झाला. परंतु, काही दिवसांपासून कोकणात आघाडीचे काही पदाधिकारी विधानसभा निवडणुकीसाठी आपआपल्या उमेदवारांची नावे जाहीर करत असून काँग्रेसला गृहीत धरत आहेत.
शिवसेना ठाकरे गटाकडून वारंवार आघाडीचे अधिकृत उमेदवार घोषित झाले असे सांगितले जात आहे. त्यामुळे आघाडीच्या मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे. आघाडीचा धर्म पाळायचा नसेल तर काँग्रेसही मैत्रीपूर्ण लढतीसाठी सज्ज आहे, असा इशारा सुनिल सावर्डेकर यांनी दिला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, जिल्ह्यातील या मतदारसंघांत मागील निवडणुकीत काँग्रेसचे परंपरागत मतदार आहेत. त्यामुळे या तिन्हीही जिल्ह्यातील ठिकाणी काँग्रेसची निवडणुकीसाठी तयारी सुरू असून या तिन्हीही ठिकाणी काँग्रेसचाच महाविकास आघाडीकडून उमेदवार दिला जाईल. येणाऱ्या काळामध्ये हुकूमशाही पद्धतीने चालू असलेल्या राज्य सरकारला घरी पाठविण्यासाठी एकजुटीने काम करण्याची गरज असून त्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते सज्ज झाले असल्याचे सुनिल सावर्डेकर यांनी नमूद केले आहे.